Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. महायुतीकडून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने महेंद्र भावसार (mahendra Bhavsar) यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) उपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेत संभ्रम आहे. संभ्रम दूर झाला नाही तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते, असे खडेबोलच महायुतीला सुनावले आहे. बैठकीनंतर माणिकराव कोकाटे पत्रकारांशी संवाद साधताना नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.


माणिकराव कोकाटे म्हणाले की, मला कुठलाही निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून निरोप आल्याने मी या बैठकीस उपस्थित होतो. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता सुरु झाली आहे. महायुतीकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली असेल तर त्यांचा प्रचार करावा यावर सर्वांचे एकमत झाले आहे. 


मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला असेल तर त्यांचे काम करावे लागेल


यात अडचण एकच आहे की, शिक्षक मतदार आहेत. ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांची निगडीत असणाऱ्यांचा शिक्षकांशी अधिक संबंध असतो. त्यामुळे ज्यांच्या संस्था आहेत. त्यांनी या निवडणुकीत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच मतदारसंघात प्रचार करताना संपर्कातील जेवढे शिक्षक मतदार आहेत. त्यांना पक्षाच्या पाठीमागे उभे करणे हे आमचे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला असेल तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल. 


अजितदादांनी आदेश दिला तर...


अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना एबी फॉर्म दिला आहे, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की,  कोण हे? आमच्या पक्षाचा उमेदवार असेल तर आम्ही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार. जर आमच्या पक्षाने माघार घेतली नसेल आणि आम्हाला अजितदादांनी आदेश दिला तर अजित दादा जे सांगितल तेच काम करणार, असे त्यांनी म्हटले आहे. 


सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेत संभ्रम 


ते पुढे म्हणाले की, मी आजच्या बैठकीत विषय मांडला की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेत संभ्रम आहे. हा संभ्रम लवकर दूर झाला नाही तर, विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते, असे खडेबोल माणिकराव कोकाटे यांनी महायुतीच्या बैठकीत सुनावले आहे. आता यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये महायुतीच्या महत्वाच्या बैठकीला भुजबळांची दांडी, जिल्ह्यात असूनही बैठकीला गैरहजर, चर्चांना उधाण