Deepak Kesarkar on Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचे त्यांनी म्हटले. फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरुन चर्चा घडवून आणली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला. मात्र, आपण त्याला नकार दिल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले. यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिले आहे. 


काय म्हणाले दीपक केसरकर? 


दीपक केसरकर म्हणाले की, महाविकास आघाडी सूडचक्र राबवत होतं. महाविकास आघाडीकाळात फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. कंगना राणावत, नारायण राणे, अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची उदाहरणे आहेत. आरोप प्रत्यारोप हे होत असतात. अनिल देशमुख यांच्यावर एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली, असे त्यांनी म्हटले आहे. 


अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीसांचा इशारा


अनिल देशमुख यांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुखांनी या आधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही.  मला देशमुखांना एकच सांगायचे आहे की, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख हे शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही, असा इशारा त्यांनी अनिल देशमुख यांना दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; श्याम मानवांचा गंभीर आरोप


अनिल देशमुखांनी खोटे गुन्हे नोंदवण्यासाठी धमकावलं, पोलीस अधीक्षकांचा CBI ला जबाब; काय आहे संपूर्ण प्रकरण?