Maharashtra Politics: गुटखा व्यापाऱ्यांवर कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता, असा धक्कादायक दावाही आज श्याम मानव यांनी नागपुरात केला आहे. श्याम मानव यांच्या एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक अहवालांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अनिल देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना श्याम मानव यांनी केलेल्या सर्व आरोपांत पूर्णपणे तथ्य असल्याचा दावा केला आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या खळबळ माजली आहे. अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या, असं सांगण्यासाठी अनिल देशमुखांवर काही लोकांकडून सातत्यानं दबाव टाकला जात होता. तसेच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांवर कसा दबाव होता, असे धक्कादायक दावे श्याम मानव यांनी नागपुरात केले आहेत.
अनिल देशमुखानी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली, तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ, अशी थेट ऑफरच अनिल देशमुखांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांना अडकवा, तुम्हाला सोडून देऊ, अनिल देशमुखांना ऑफर : श्याम मानव
श्याम मानव यांनी सांगितलं की, "अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावं, अनिल परब यांचंही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र, अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही."
अजित पवारांना नाहीतर किमान ठाकरे पिता-पुत्रांना तरी खोट्या प्रकरणांत अडकवा, अनिल देशमुखांना ऑफर : श्याम मानव
एवढंच नाही तर अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून त्यांनी तपास यंत्रणांना जबाब द्यावा की, अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत त्यांना देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यवसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करून द्यावी, असं सांगितलं होतं. मात्र अनिल देशमुख यांनी तसं करण्यासही नकार दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना तुम्ही अजित पवारांना अडकवू शकत नसले, तरी किमान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांची नावं घेऊन त्यांना खोट्या प्रकरणात अडकवा, अशी नवी ऑफरही देण्यात आली होती, असा दावाही श्याम मानव यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब या तिघांचं नाव घेण्यास नकार दिला. त्यामुळेच अनिल देशमुख यांना 13 महिने तुरुंगात राहावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे. संजय राऊत यांनाही अशाच पद्धतीनं खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावाही श्याम मानव यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ : Shyam Manav EXCLUSIVE : ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी देशमुखांवर दबाव होता