Dharashiv News: धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.  धाराशिवचे  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर(Om Rajenimbalkar) आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्त संचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Sachin Ombase) यांनी  काढले आहेत. लोकसभा निवडणूकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केल्यानंतर अर्चना पाटलांनी खेळी खेळल्याची चर्चा सुरु असून खासदार ओमराजेंच्या अडचणी वाढत असल्याची चर्चा सुरु आहे.


अर्चना पाटील यांच्या उमेदवार प्रतिनिधींनी तक्रार केली होती. 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यादिवशी मतमोजणी केंद्रात विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे त्यांच्या अंगरक्षकांसह मुक्त संचार करीत होते. त्यामुळे मतमोजणी अधिकारी , कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण झाला आणि आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार अर्चना पाटील यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांनी ६ जून रोजी केली होती.


लाेकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचा भंग


धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला होता. राजेनिंबाळकर आणि पाटील कुटुंबातील वाद सर्वश्रूत असून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात लोकसभा निवडणूकीत हायव्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केल्यानंतर लोकसभेच्या निकालादिवशी ओमराजे निंबाळकर यांचा त्यांच्या अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्तसंचार सुरु असल्याने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अर्चना पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. यावर धाराशिवचे जिल्हाधिकारी सचीन ओम्बासे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


2019 च्या निवडणुकीत 1.27 लाख मतांनी विजय


2004 साली कल्पना नरहिरे येथून धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेच्या खासदार बनल्या. तर, 2009 साली राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पद्मसिंह पाटील केवळ 6,787 मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या विजयाची परंपरा त्यांनी मोडित काढली. मात्र, पुन्हा 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत रविंद्र गायकवाड हे धनुष्यबाण चिन्हावर 2 लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन दिल्लीला पोहोचले. 2019 च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तिकीट देण्यात आले. ओमराजे यांनीही 2019 ची निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली अन् राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांना पराभूत करत ते 1 लाख 27 हजार मतांनी विजयी झाले.


हेही वाचा:


विक्रमादित्य ओमराजे... धाराशिवमधून सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी; 2 लाख 63 हजार मतांची आघाडी