Sharad Pawar: शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; पक्षप्रवेशावेळी सगळंच काढलं
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून वाटाघाटी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्याने सध्या महाविकास आघाडीकडे येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही (ncp) राजकीय नेत्यांचा ओढा वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 जागांवर विजय मिळाला. त्यामध्ये, सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरली ती बीड लोकसभा मतदारसंघातील. येथे बजरंग सोनवणेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे, येथील मतदारसंघात शरद पवारांनी लावलेलं उमेदवाराचं गणित चांगलंच जुळलं. आता, विधानसभेलाही शरद पवारांनी (Sharad pawar) परळी मतदारसंघ मनावर घेतला आहे. विधानसभेला आपण परळीत मोठी सभा घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. त्यामुळे, परळीतील आमदार धनंजय मुंडेंविरुद्ध (Dhananjay munde) आता शरद पवारच मैदानात उतरणार असल्याचे दिसून येते.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती तुतारी घेतली. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते. त्यातच, शरद पवारांनी या पक्षप्रवेशावेळी तसे संकेतही दिले आहेत.
सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे, येथील चित्र बदलतय, लोकसभा निवडणुकीआधी सुद्धा ते दिसलं. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही 400 पार निवडून येणार, पण त्यांचे किती खासदार आले. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागा आपण जिंकून आणल्या, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले, असे म्हणत शरद पवारांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
परळीत मोठी सभा घेणार
ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, आता फक्त दोन महिने राहिले आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी धनंजय मुंडेंबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यांच्या जोरदार टीकाही केली होती. आता, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवारांनी परळीत विशेष लक्ष दिल्याचं स्पष्ट केलं आहे.
बीड हा शरद पवारांचा जिल्हा - सोनवणे
परळी काय करते? लोकसभेत दाखवून दिलंय, शरद पवारांचा नाद केल्यावर काय होतं?. शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात पवार साहेबांची ताकद आहे, यावर संशोधन करण्याची गरज नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. तसचे, राजे भाऊ तुमचं कौतुक, तुम्ही खरे बोलणारे आहात. परळीतून ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते सावध रहा, बळजबरी कोणाला येथे प्रवेशाला आणलं नाही. राजाभाऊ यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आता, 2 महिने तुम्ही सहन करा, खासदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे, आता आपलं सरकार येणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
हेही वाचा
घरबसल्या काढा दाखले; सरकारी दफ्तरची झंटट नको, महा-ई-ग्राम ॲप करा डाऊनलोड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
