Sharad Pawar: शरद पवार संपले म्हणणारे विरोधी पक्षात बसले, आता ते 'डेप्युटी' आहेत; पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
Nagpur News: पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एक नेता म्हणायचा की, शरद पवारांचं राजकीय पर्व संपलंय, पण निकालानंतर त्यालाच विरोधात बसावं लागलं; पवारांचा फडणवीसांना टोला. पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले
नागपूर: शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्दी संपली आहे, या भाजपच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीचे यवतमाळमधील उमेदवार संजय देशमुख आणि अमर काळे यांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी भरण्यात आले. यानंतर नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीसह विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विरोधकांकडून त्यांच्याविषयी सुरु असणाऱ्या प्रचारमोहिमेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.
राज्यात सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार यांचं राजकीय पर्व संपलं आहे, अशा आक्रमक प्रचार केला जात आहे. भाजपने अजित पवार यांना आपल्या बाजूने वळवून घेतले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्हही शरद पवार यांच्याकडून काढून घेतले. या गोष्टींमुळे शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्दी संपली आहे, असा प्रचार सातत्याने सुरु आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न एका पत्रकाराने शरद पवार यांना विचारला. या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले, असे शरद पवार यांनी म्हटले.
सातारा आणि बारामतीमध्ये काय होणार?
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना सातारा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी विचारणा करण्यात आली. यावर शरद पवारांनी सांगितले की, सातारची जागा आम्ही 100 टक्के जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन चांगले उमेदवार आहेत. तर बारामतीमध्ये अजून निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली नाही. मतदान व्हायचे आहे. मतदान झाल्यानंतरच येथील जनतेचा कल कळेल. यापूर्वी बारामतीमधून सुप्रिया सुळे जिंकल्या आहेत. भविष्यातही त्या जिंकतील, ही अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना लोकांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता. लोकांमध्ये एक परिवर्तनाची भावना आहे. फक्त एकच काळजी आहे की, दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सभेत विरोधी पक्षांचे नेते होते. सर्वांची भावना होती की, देशात लोकशाहीवर हल्ला होत आहे. आदिवासी राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्रीही तुरुंगात आहेत. देशाच्या घटनेवर हल्ला होत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांनी आघाडी केली. येत्या काही दिवसांमध्ये आणखी नेत्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. परिस्थिती आणखी बिघडू शकते, असेही शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा