Sharad Pawar-Vijaysinh Mohite–Patil-Sushilkumar Shinde, at Solapur : महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी ज्यांचा दरारा होता. ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्ष गाजवलं. राष्ट्रीय पातळीवरही देशाचं नेतृत्व केलं, अशा दिग्गज नेत्यांचं त्रिकुट आज (दि.14) सोलापुरात पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) जवळपास 20 वर्षांनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सोलापुरात तिन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामुळे महाविकास आघाडीला सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत नवसंजीवनी मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी तिन्ही नेत्यांच्या बैठकीबाबत भाष्य केलं आहे.
जयसिंह मोहिते पाटील काय म्हणाले?
सोलापूर, माढा, उस्मानाबाद, बारामती, आणि शिरुर या 5 ते सहा जिल्ह्यात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर तिन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव पडेल. मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही. परंतु एक जनमाणस पाहिल्यानंतर मला असं वाटतय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार असतील किंवा काँग्रेस, शिवसेना असेल या तिन्ही पक्षांना भाजप पेक्षा जास्त जागा येतील. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीला चांगलं मतदान होईल. त्यांचे उमेदवारही निवडून येतील.
2019 पासून विजयसिंह मोहिते पाटील राजकारणापासून अलिप्त
भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील घराण्याला गळाला लावलं. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्येही गेले नाहीत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही सक्रिय झाले नाहीत. त्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून विजयसिंह मोहिते पाटील राजकारणापासून अलिप्त होते. शिवाय डिसेंबर 2020 त्यांनी मी कोठेही गेलेलो नाही, असं विजयदादांनी स्पष्ट केलं होतं. गेल्या 6 महिन्यांपूर्वी शरद पवारांनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूर केली होती. शिवाय गेल्या काही आठवड्यांपासून विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार वारंवार एकत्र आल्याचेही पाहायला मिळाले आहे.
धैर्यशील मोहितेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
गेल्या अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी आज (दि.14) राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवाय प्रवेश करण्यापूर्वीच शरद पवारांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं होतं. माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे माढात मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhairyasheel Mohite-Patil : माढ्यात शरद पवारांनी निर्णायक डाव टाकलाच; धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यात गणिते बदलली