शिर्डी (अहमदनगर) : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Seat) महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. राज्यातील तीन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डीतील महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे देखील उपस्थित होते. मात्र, कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हे याही कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते. आशुतोष काळे यांनी हा मुद्दा उचलला होता, मात्र सदाशिव लोखंडेनी पण ते सोबत येतील, असं म्हटलं.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रचार कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर राज ठाकरे यांचा फोटो देखील दिसून आला. उद्घाटन सोहळा कार्यक्रमात आशुतोष काळे यांनी नाव न घेता कोल्हेंच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला तर विद्यमान खासदार लोखंडे यांनी माजी खासदार वाकचौरे यांच्यावर निशाणा साधत कोल्हे देखील आपल्याबरोबर राहतील असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या सोहळ्यात अधिकच आक्रमक दिसले. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी भाषणातून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह थोरात यांच्यावर जोरदार टीका केली तर उमेदवार लोखंडे यांना सुद्धा सल्ला दिला.
आमदार आशुतोष काळे म्हणाले प्रत्येक मतदारसंघातून मतांचं लीड देण्याची स्पर्धा सध्या सुरू झाली आहे. कोपरगावचा विचार केला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून महायुतीत आहोत. त्यामुळे दोन्ही नेते एकाच पक्षात असल्याने समोर कोणी नाही. मात्र आता कोण यात बरोबर आहे कोण नाही हे लोखंडे साहेबांनी बघितलं पाहिजे असं आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांचं नाव न घेता म्हटलं. आम्ही तर सगळे प्रयत्न करणारच आहोत. एकदा आम्ही शब्द दिला की त्यात काही झालं तरी माग फिरत नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करणारच आहोत असा शब्द या निमित्ताने देतो, असं आशुतोष काळे म्हणाले.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की केवळ सभा मंडप देऊन विकास होत नाही. माजी खासदारांनी खासदार निधी सोडून एक तरी काम केलंय का हे दाखवावं.. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. जर काम करणारे खासदार होते तर यांचा खासदार निधी शिल्लक कसा राहिला त्यावेळी याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना केला.
सदाशिव लोखंडे पुढं म्हणाले की 2014 ला मला मुरकुटे आणि काळे यांच्या सहकार्याने निवडून आलो.. 2019 ला परिवर्तन झालं आणि विखे साहेबांमुळे खासदार झालो.आता 2024 ला विखे काळे बरोबर आहेत.. कोल्हेंबाबत अनेकांना शंका आहे मात्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कोल्हे पाठीशी राहतील यात मला शंका नाही, असं सदाशिव लोखंडे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदेंनी मला सांगितलंय या पुढील काळात तुमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील.इथून मागे काही चुका झाल्या असतील त्या सोडून द्या यापुढील काळात विखेंच्या नेतृत्वाखाली काम करणार, असं सदाशिव लोखंडे म्हणाले.
संबंधित बातम्या :