Girish Mahajan : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर अंधाधुद गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. यावेळी पाच राऊंड फायर करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. आता सुप्रिया सुळेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 


अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराचे (Firing) कारण अद्याप समोर आलेले नसून या घटनेवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे स्वतः लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. 


काही जणांकडून राजकीय पोळी भाजण्याचं काम 


या घटनेवरून काही जण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचे म्हणत गिरीश महाजन यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. तर आपल्या सरकारच्या काळात गृह खात्याचा सर्रास लिलाव सुरू होता. त्यामुळे दीड वर्ष तुमच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा थेट हल्लाबोलही गिरीश महाजन यांनी सुप्रिया सुळेंवर केला आहे. 


उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय


खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. मात्र याचा राग येऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत जे आक्षेपार्ह विधान केले यावरून उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावरून राजकारणाचा स्तर किती खाली चालला असून आज जर ही उद्धव ठाकरेंची परिस्थिती असेल तर उद्या निकाल लागल्यावर काय होईल असा चिमटा ही गिरीश महाजन यांनी काढला आहे.


गिरीश महाजन-अजित पवार भेट


मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. दरम्यान धाराशिवच्या जागेबाबत यावेळी चर्चा करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे तसेच राज्यातील इतर जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाली असून या बैठकीदरम्यान जगदीश सिंग राणा हेही उपस्थित असल्याचे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.


गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला


एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्यावर दबाव असल्यामुळे खडसेंनी घर वापसीचा निर्णय घेतला असल्याचे विधान शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले होते. मात्र एकनाथ खडसे व शरद पवार यांच्यातील प्रेम हे चांगलं असून खडसेंबाबत शरद पवारांचे मन मोठे आहे, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंसह शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. तर खडसे कंटाळून भाजपामध्ये येत आहेत की त्यांना घरची आठवण येत आहे याचे कारण एकनाथ खडसेच सांगू शकतील. त्यामुळे दिल्लीला एकनाथ खडसे वारंवार का जाऊन बसतात व आता खडसेंनी मौन का बाळगले हे त्यांनाच विचारा, असे देखील गिरीश महाजन म्हणाले.


आणखी वाचा 


बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान? गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत भाईजानला धमकी