Sharad Pawar News : बारामती (Baramati) म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण. गेली 6 दशकं पवारांनी कुटुंब एकसंघ ठेवलं होतं. त्यामुळे राज्यातील पावरफुल राजकीय घराण्यांपैकी एक म्ह्णून पवारांची ओळख निर्माण झाली होती. या 6 दशकात अनेक जण पवारांना सोडून गेले. पण जेव्हा शरद पवारांना पुतण्या सोडून गेला तेव्हा पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साथ घालायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. 


शरद पवारांचे जुने सहकारी त्यांना साथ देणार?


शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा केंद्रीय मंत्री तसेच गेली 50 वर्ष सतत कुठल्या ना कुठल्या सभागृहात सदस्य आहेत. ही कारकीर्द उभा करत असताना अनेक सहकाऱ्यांना सोबत घ्यावं लागलं. अनेकांनी कालांतराने त्यांची साथ सोडली. पण पुतण्याने बंड केल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यातील बहुसंख्य नेते ते महायुतीत आहेत. त्यांना प्रतिक्रिया विचार असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.


चंद्रराव तावरे 


चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांसोबत 40  वर्ष काम केलं. शरद पवारांच्या पहिल्या निवडणूकीचा प्रचार चंद्रराव तावरे यांनी केला. 1997 साली त्यांच्यात वितुष्ट आलं. आणि तावरे यांनी पवारांची साथ सोडली. चांद्रराव तावरे सध्या भाजपमध्ये आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सध्या विद्यमान संचालक आहेत. त्यानंतर अजित पवारांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत चंद्रराव तावरे  काटेवाडी मंचावर दिसले. 


पृथ्वीराज जाचक 


पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनंतर सुनेत्रा पवारांनी जाचक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. जाचकांनी शरद पवारांसोबत 1984 ते 2003 पर्यत काम केलं. छत्रपती सहकारी साखर कारखान्यामुळे जाचक हे पवारांपासून वेगळे झालं. पृथ्वीराज जाचक सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत.. पृथ्वीराज जाचक हे साखर संघाचे माजी अध्यक्ष आहेत.


हर्षवर्धन पाटील


इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. परंतु अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला असे बोललं जातं आहे..2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीचे काम केलं परंतु हर्षवर्धन पाटील यांना काँगेस मधून इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिकिटाचा पेच निर्माण झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम केला. 


अजित पवार महायुतीत आले, तरी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार संघर्ष कमी झाला नाही. अंकिता पाटील यांनी आमच्या पाठीत 2009, 2014 आणि 2019 ला खंजीर खुपसला अशी टीका नाव न घेता राष्ट्रवादी वर केली होती. त्यावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष टोकाला गेला होता. त्यातच हर्षवर्धन पाटील आणि आमचे घरगुती संबंध आहेत असं सुप्रिया सुळे  म्हणताच अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना सबुरीने घ्या असे सूचना केल्यात. 


विजय शिवतारे


शिवसेना नेते विजय शिवतारे यांची राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी मधून झाली. 2009 आणि 2014 ला सेनेतून विजय शिवतारे यांनी पुरंदर हवेली चे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं..2019 साली अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडले, त्यावेळी अजित पवार आणि शिवतारे यांचे संबध बिघडले. 


2024 ची बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी शिवतारे यांनी दाखवली होती. त्या प्रमाणे त्यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे देखील वाढले. अजित पवार भाजप सोबत सत्तेत आले त्यावेळी शिवतारे यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांचे महायुतीत स्वागत केलं. अजित पवार महायुतीत आले आणि शिवतारे यांचे बारामती लोकसभा मतदारसंघातील दौरे कमी झाले.


या सगळ्या नेत्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. त्यामुळे या नेत्यांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची असणार आहे. हे सगळे नेते सध्या महायुतीत आहेत. पण अजित पवार जरी महायुतीत गेले असले तरी या सर्वच नेत्यांची 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भूमिका महत्त्वाची असणार आहे. शरद पवार हे जुन्या सहकाऱ्यांना साद घालणार का? आणि जरी साथ घातली तरी जुने सहकारी त्यांना साथ देणार का? यावर सुप्रिया सुळे यांचे भवितव्य ठरणार आहे.