CM Eknath Shinde Banner in Anganewadi Sindhudurg News : आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी लावण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याचं समोर आलं आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हात भराडी देवीच्या यात्रेला येत आहेत. या पार्श्भूमीवर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, भराडी देवीच्या मंदिराजवळील कमानीवरील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे लावलेले बॅनर अज्ञात इसमाने फाडले आहेत. गेल्या वर्षी देखील मुख्यमंत्र्याचे बॅनर फाडण्यात आले होते.


उद्यापासून आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात


कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. मसुरे गावच्या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक 'आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर' म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं मंदिर सर्वांसाठी दर्शन खुले असते.


भराडीदेवी यात्रेची खासियत काय?


गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचं दर्शन घेतात. या जत्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं म्हटलं जातं. मोठ्या उत्साहात आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रा होते, यात भाविकांसह राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री देखील यावर्षी भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत.