Maratha Reservation Latest Update : एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असताना आता मराठा आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर लवकरच सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.


मराठा आरक्षणाचा वाद हायकोर्टात


राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाप्रकरणी सदावर्तेंंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीत केलेल्या बदलालाही आव्हान देण्यात आलं आहे. 


याचिकेतून अनेक गंभीर आरोप


निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. तर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे.


विनोद पाटील यांच्याकडून कॅव्हेट याचिका दाखल


याप्रकरणी आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल झाली आहे. तर, यावेळी कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा लढा हायकोर्टात सुरू होणार असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 


मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण


राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून लागू असलेलं आरक्षण लागू असेल. पण ज्यांच्याकडे कुठल्याही नोंदी नाहीत, त्या नोंदी नसलेल्यांना सर्व मराठा समाजाला स्वतंत्र मराठा देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरकारने केली होती.


मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं : जरांगे


आता राज्य सरकारने ओबीसी (OBC) कोट्यातून आरक्षणाऐवजी मराठा समाजाला स्वतंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळतं तेच मिळणार, ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत, त्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरुच आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CM Eknath Shinde : भराडी देवीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले, उद्यापासून आंगणेवाडी यात्रेला सुरुवात