मुंबई : सध्या सर्वांचं लक्ष लागलंय ते राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे (Vidhan Sabha Election) . दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी सध्या चर्चा सुरू आहे. याचमुळे सगळे पक्ष कामाला देखील लागलेले आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) विनंती केली आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या, अशी विनंती शरद पवारांनी सु्प्रीम कोर्टाला केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं, असे शरद पवार म्हणाले. घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे.
शरद पवारांना तुतारी चिन्ह
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' असं नाव दिलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. त्या चिन्हावर निवडणूक लढवून शरद पवारांनी आठ खासदार निवडून आणले. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला.
विधानसभेलाही तुतारी चिन्हावर लढावे लागण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाचे यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.
याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला. पक्षाचे जवळपास 43 आमदार आहेत तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) 12 आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Politics : लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'NCP', तर शिवसेनेचा 'शिवसेना शिंदे' असा उल्लेख