Maharashtra Politics : गेल्या दोन अडीच वर्षांत महाराष्ट्रात (Maharashtra Politics) अभूतपूर्व सत्तासंघर्ष (Maharashtra Politicle Crisis) पाहिला आहे. सत्तासंघर्षाच्या पहिल्या अंकाची सुरुवात राज्यातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेपासून (Shiv Sena) झाली, शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत थेट पक्षावर दावा केला. त्यानंतर दुसरा अंक रंगला तो शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीमुळे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केवळ बंडखोरी करत पक्ष फोडला नाहीतर थेट पक्षावर दावा केला. अनेक दिवस सत्तासंघर्षाचा खेळ सर्वोच्च न्यायालयात रंगला. अद्याप या सत्तासंघर्षाच्या खेळाचे नवनवे अंक, वेगवेगळ्या तारखांना सर्वोच्च न्यायालयात रंगल्याचं पाहायला मिळतं. पण, या सत्तासंघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षांवर दावा करणाऱ्या शिंदे आणि अजितदादांना मूळ पक्ष दिला, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी नवं पक्षाचं नाव आणि नवं चिन्ह घेत लोकसभा निवडणूक लढवली.
नावात काय आहे? असं म्हणतात, पण नावात बरंच काही असतं, हे राज्यातील सत्तासंघर्षाच्या राजकीय नाट्यात पाहायला मिळालं. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कधीकाळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेला शिवसेना हा मूळ पक्ष आणि अजित पवारांकडे कधीकाळी शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवारांकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण राजकीय पक्षांच्या नावाचा वाद पाहिला आहे. पण, लोकसभा सचिवालयानं कार्यालयांचं वाटप करताना पक्षांच्या नावाचा जो उल्लेख केल्या, त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा सचिवालयानं बुधवारी पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कार्यालयांचं वाटप केलं. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख राष्ट्रवादीचं मूळ नाव NCP म्हणजेच, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी असा केला आहे. तर शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी?
लोकसभा सचिवालयानं पक्षांच्या संख्याबळानुसार, बुधवारी कार्यालयांचं वाटप केलं. त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आलंय, अजित पवारांच्या पक्षाला मात्र संख्याबळाअभावी कार्यालय मिळालं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कार्यालयांच्या यादीत लोकसभा सचिवालयानं शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपी असाच केला आहे. राष्ट्रवादीचं हेच मूळ नाव आहे. आणि फुटीनंतर ते अजितदादांच्या पक्षाला मिळालं होतं. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, असं नवं नाव शरद पवारांच्या पक्षाला दिलं होतं.
शिंदेंच्या पक्षाचं नाव शिवसेना शिंदे?
शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी ठाकरे आणि शिंदेमध्ये मोठा राजकीय संघर्ष झाला. अखेर निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलासा देत शिवसेना हे मूळ त्यांच्या पक्षाला दिलं. आणि ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं. पण लोकसभा सचिवालयानंच आता शिंदेंच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात 128 क्रमांकाचं दालन, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 128 A हे दालन देण्यात आलं आहे.