Sharad Pawar: पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेत आहेत. या सभांमधून ते व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करत आहे, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महायुतीचे पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha Election) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा घेतली. या सभेत बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. मोदींनी पवारांचा भटकती आत्मा ( Bhatakti aatma) असा उल्लेख केला. त्यावर महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. मोदींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका देखील केली. शरद पवारांनी देखील मोदीच्या वक्तव्याचा चांगलाचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घाबरले आहेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले, असे प्रत्युत्तर मोदींना दिले आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी सभा घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सभा घेऊन ते सांगत काय आहेत तर व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करत आहे. हे योग्य नाही. मला ते भटकती आत्मा म्हणाले. मुळात त्यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला पाहिजे परंतु त्यांनी लोकांची निराशा करण्याचं काम केलं आहे. मला भटकती आत्मा म्हणणं, राहुल गांधींना शहाजहा म्हणणं हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत.
शिवसेना आणि आपसोबतच्या युतीविषयी शरद पवार म्हणाले... (Sharad Pawar on Shiv Sena AAP Alliance)
शिवसेना आणि आपच्या युतीबाबत शरद पवार म्हणाले, पहिल्यांदा आमच्यासोबत शिवसेना निवडणूक लढत आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले पण शिवसैनिक जागेवरच आहेत. एक मोठा कट्टर शिवसैनिकांचा वर्ग आमच्या सोबत जोडला गेला याचा आम्हाला आनंद होता. शिवसेनेसोबतच आम आदमी पक्ष यांचा देखील आम्हाला फायदा झाला. आम आदमी पक्षाची आमच्यासोबत युती नाही. या राज्यात कशाची अपेक्षा न करता ते आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्ते कमी आहेत पण जे आहेत ते खूप निष्ठावान आहेत. शिवसेना आणि आपचे कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले गेले हा सुखद अनुभव होता.
यंदाच्या निवडणुकीत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली : शरद पवार
निवडणूक आयोग सध्या असे काही निर्णय घेत आहेत त्यामुळे अडचण होत आहे. आमचा पक्ष काढून घेतला आमचे चिन्ह काढून घेतला आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं. यंदाच्या निवडणुकीत आम्ही सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वतः 48 पैकी दहा जागा लढवत आहोत आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना पाहायला मिळतोय, असेही शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा :
Sharad Pawar : गरज संपल्यावर भाजपची जी भावना संघाबाबत, तीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत असेल : शरद पवार