Sharad Pawar on Kiran Lahamate, Akole : "मला  आणखी दोन ठिकाणी जायचं आहे. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही, पण अमित भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही पाठीमागे रहा आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताकतीने आम्हा लोकांची मदत असेल आणि मी  तुम्हाला तुमच्या मदतीने खात्री या ठिकाणी देतो की, अकोला तालुक्यात बदल  झाल्याशिवाय राहणार नाही", असे आश्वासन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. ते अहमदनगरमधील अकोले (Akole) येथे बोलत होते. 


5 वर्षांपूर्वी एका  डॉक्टरला निवडून दिलं, मीच तुम्हाला सांगितलं निवडून द्यायला


शरद पवार म्हणाले, 5 वर्षांपूर्वी एका  डॉक्टरला निवडून दिलं, मीच तुम्हाला सांगितलं निवडून द्यायला. मला असं  वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल, लोकांना पाठिंबा देईल, लोकांची  साथ सोडणार नाही इथे भाषण केलं काही झालं तर पवार साहेबांची साथ सोडणार  नाही. मुंबईत गेला भलती तिकडेच जाऊन बसला. आता कुठे बसायचं? हे ज्याला कळत  नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला आणि  मला या ठिकाणी ठरवायचं आणि हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या पाठीशी  शक्ती उभी करून मी तुम्हाला सांगतो या अकोल्याचा विकास या जनतेच्या तुमच्या  तरुणांच्या ताकतीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणाच्या सामूहिक शक्तीतून  आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.


अशोकरावांच्या डोळ्यात पाणी  होतं पण चिंता नुसती अमितची नव्हती तर अकोल्याच्या गोरगरीब जनतेची 


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला  आठवतंय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो, त्याठिकाणी अशोकराव  होते. भाषणाला उभे राहिले आणि अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेची एकच गोष्ट  सांगितली मला की पवारसाहेब, आमचं तुमच्याकडून काही मागणं नाही फक्त एकच काम  करा "माझ्या मुलावर लक्ष ठेवा" अमितवर लक्ष ठेवा. अमितवर लक्ष ठेवा हा  शब्द त्यांनी जाहीर सभेतून माझ्याकडून घेतला. अशोकरावांच्या डोळ्यात पाणी  होतं पण चिंता नुसती अमितची नव्हती तर अकोल्याच्या गोरगरीब जनतेची होती आणि  त्या जनतेची, त्यासाठी कष्ट करणार, त्याच्यासाठी बांधिलकी ठेवणार,  त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणार ही त्यांची अपेक्षा अमित आणि सुनिता  ताईंकडून होती. मला आनंद आहे की, आज त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा  पाळला.


काळ्या आईशी इमान राखणारा माझा  बळीराजा 


आधीच्या  वक्त्यांनी शेती, शेतकरी अशा अनेक प्रश्नांच्या संबंधीचे विचार मांडले. आज  देश एका संकटातून जातोय, कष्ट करणारा काळ्या आईशी इमान राखणारा जो माझा  बळीराजा आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात  ठेवलं पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते यासंदर्भात कधी लक्ष देत नाहीत. आपण  बघितले गेल्या काही दिवसांमध्ये शेतीमालाची किंमत ज्याचा उल्लेख या ठिकाणी  केला गेला. काही कुणी जास्त मागत नाही. पण शेतीमाल पिकवण्याच्यासाठी  लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढं तरी पदरात त्या बळीराज्याच्या पडलं पाहिजे,  एवढी एकमेव मागणी त्या ठिकाणी आहे, असंही शरद पवार म्हणाले.