सातारा: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अखेर ठरला आहे. शरद पवार (Sharad Pawar Camp) गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवार देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शशिकांत शिंदे हे येत्या 15 तारखेला 11 ते 2 या वेळेत सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शरद पवार गटाकडून मंगळवारी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त परिषदेत साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. त्यानंतर शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना साताऱ्यात मविआकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. शरद पवार स्वत: शशिकांत शिंदे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी साताऱ्यात जाणार आहेत. त्यादृष्टीने साताऱ्यात शरद पवार गट आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
उदयनराजे भोसले दिसताच शाळकरी मुलांची कळी खुलली; थेट रस्त्यावर राजेंसोबत 'फोटोसेशन'!
साताऱ्यात उमेदवार निवडण्यासाठी शरद पवारांचा वेटिंग गेम
सातारा लोकसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, यंदा त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीला उभे राहण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे साताऱ्यात कोणाला उभे करायचे, हा प्रश्न शरद पवार गटासमोर होता.
शरद पवार यांच्याकडून मध्यंतरीच्या काळात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर साताऱ्यातून लढण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे शरद पवार साताऱ्यातून कोणाला रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहेत शशिकांत शिंदे?
माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत. शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. या दोन्ही तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करतील.
आणखी वाचा