हिंगोली : राज्यभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, खासदार होण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार बदलण्याची नामुष्की आल्यानंतर हिंगोली मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Election) चांगलाच चर्चेत आला आहे. यंदा या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचं दिसतंय. कारण या मतदारसंघातून एका उच्चशिक्षित तृतीयपंथीय उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघाच्या अद्याप न सुटलेल्या समस्यांसाठी आपल्याला संसदेत पाठवा असं आवाहन विश्वनाथ फाळेगावकर (Vishwanath Falegaonkar) या तृतीयपंथीय उमेदवाराने केलं.
हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून सोमवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केलं जाईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्यासाठी एका उच्चशिक्षित तृतीयपंथी उमेदवारने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर यामध्येच संशोधनाचं काम करणाऱ्या विश्वनाथ फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराला हिंगोली लोकसभेचा खासदार व्हायचंय.
हिंगोलीतील समस्या जशाच्या तशाच
हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक समस्या आहेत ज्या समस्या अजूनही मार्गी लागल्या नाहीत. मतदारसंघामध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला आहे आणि लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न न मांडता दिल्लीमध्ये झोपा काढतात असा आरोपसुद्धा या उमेदवारांने केला आहे.
विश्वनाथ फाळेगावकर हे कॉम्प्युटर इंजिनिअर असून त्यांनी M Tech पूर्ण केलं आहे. तसेच मुंबई IIT मध्ये ते PhD करत आहेत. एक शास्त्रज्ञ बनायचं त्यांचं स्वप्न आहे. पण हिंगोली जिल्ह्यातील आताच्या समस्या पाहिल्या तर त्याचं वाईट वाटतंय असं ते म्हणाले. आपण ज्यावेळी हिंगोली सोडून मुंबईला शिक्षणाला गेलो, तेव्हाची आणि आताची परिस्थिती सारखीच असल्याचं ते म्हणाले.
संसदेत मुद्दे मांडता आले पाहिजेत
हिंगोलीत शिक्षण आणि आरोग्याची सुविधा काहीच नाही, ती सुधारावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेत बोलताना तुम्हाला मराठी, हिंदीसोबत इंग्रजीही आली पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधींना साधं बोलता येत नाही, त्यांना मुद्दे मांडता येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. खासदारांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले.
आतापर्यंत कोणत्याही पक्षाशी चर्चा झाली नाही, आपण अपक्ष उभारणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा :