पंढरपूर : उठता बसता पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना शिव्या घालणारे शरद पवार (Sharad Pawar) साहेब देखील मोदींचीच भाषा बोलत त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगत असतील तर शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहावे? असा सवाल करीत पवारांची ही भूमिका धाडी थांबवण्यासाठी होती का? असा सवाल राजू शेट्टी यांनी आज पंढरपूर येथील स्वाभिमानीच्या मेळाव्यात बोलताना केला. 


एक रकमी एफआरपी देण्यावरून आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवते तर भाजपवाले हे राज्य सरकारचा निर्णय असल्याचे सांगते. मोदींनी उत्तर प्रदेशमधील कारखानदारांचा विचार आहे तर त्यांची री पवार साहेब का ओढतात? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी पवारांना याचे उत्तर द्यावे असे आवाहन केले आहे. 


Maharashtra Income Tax Raids : कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया..
      
राज्यात सध्या टोळी युद्ध सुरु आहे, एका बाजूला केंद्रीय मंत्र्याला राज्य सरकारने अटक केली कि इकडे थेट उपमुख्यमंत्र्यांच्या लोकांवर आयकराच्या धाडी सुरु झाल्या आहेत. यात आम्हाला स्वारस्य नसून या धाडीतून काय हाती लागले ते जाहीर करावे अन्यथा या धाडी राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी आहेत असे आम्ही समजू, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला. यंदा 19 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणारी विसावी ऊस परिषद विक्रमी गर्दीत होणार असून यावेळी जागतिक पातळीवर साखरेचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने एफआरपीपेक्षा जास्त दर शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. 


ऊस परिषदेसाठी विक्रमी गर्दी होणार असून आपण जगलो तर कोरोनाचा विषय.. त्यामुळे कोरोना बोरोना गेला खड्ड्यात असे सांगत ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी ऊस शेतकऱ्यांना केलं आहे. यावेळी 25 लाख फोन कॉल करण्याचे मिशन हाती घेतल्याचे सांगत यानंतर एक रकमी एफआरपीसाठी सर्वोच्य न्यायालयात जाणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.