नवी दिल्ली : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना आज जाहीर करण्यात आलीय. जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रथमच मोठ्या प्रमाणात फेररचना करण्यात आलीय. तब्बल 80 जणांची जम्बो कार्यकारिणी आज जाहीर झाली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कुणाची नव्यानं एन्ट्री, तर कुणाला डच्चू? हीच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यकारिणीतून वगळलं गेलेलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे वरुण गांधी आणि मेनका गांधी. वरुण गांधी हे लखीमपूर घटनेवर सातत्यानं जाहीरपणे आवाज उठवत होते आणि नेमकं त्याचवेळी त्यांचं नाव राष्ट्रीय कार्यकारिणीतून गायब झालेलं आहे. तर महाराष्ट्रातून सरप्राईज एन्ट्री आहे चित्रा वाघ यांची. काय आहेत या कार्यकारिणीची वैशिष्ट्ये पाहूयात.



भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची वैशिष्ट्ये



  • भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 80 सदस्य आहेत तर 50 विशेष निमंत्रित आणि 179 पदाधिकारी आहेत ज्यात मुख्यमंत्री, प्रभारी आदींचा समावेश आहे.

  • आधीच्या कार्यकारिणीत असलले वरुण गांधी, मेनका गांधी, चौधरी विरेंद्र सिंह यांना नव्या यादीतून वगळले.

  • राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांची थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्ण लागलीय.

  • तर पीयुष गोयल, नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे इतर कॅबिनेट मंत्री कार्यकारिणीत असताना नारायण राणे यांना मात्र कार्यकारिणीत स्थान दिसत नाहीय.


 
नारायण राणेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही
नारायण राणेंना भाजपनं केंद्रात मंत्रिपद दिलं. मात्र, पक्षासाठी महत्वाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान दिसत नाहीय. महाराष्ट्राचे इतर सर्व कॅबिनेट मंत्री कार्यकारिणीत आहेत, इतकंच काय ज्योतिरादित्य शिंदे, आश्विनी वैष्णव यांच्यासारखे राणेंसोबतच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आणि बाहेरून पक्षात आलेलेही कार्यकारिणीत आहेत. मात्र, या दोन्ही निकषांतूनही राणेंना स्थान मिळालं नसल्याचं दिसतंय. 


भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र कुठे?



  • नितीन गडकरी, पीयुष गोयल, प्रकाश जावडकेर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत.

  • विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर हे आधीप्रमाणे याही कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्री म्हणून कायम.

  • देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे विधानसभा, विधानपरिषदेचे गटनेतेही कार्यकारिणीवर.

  • महाराष्ट्रातून आशिष शेलार, सुधीर मुनंगटीवार, लड्डाराम नागवानी हे विशेष आमंत्रित आहेत.

  • राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून 26 जणांच्या यादीत महाराष्ट्रातल्या हीना गावित एकमेव आहेत.


जे पी नड्डा यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जुन्या कार्यकारिणीत काही बदल झाले होते. पण ते बदल फार मोठे नव्हते. आता नड्डांच्या नेतृत्वातली ही पहिली कार्यकारिणी म्हणता येईल. भाजपच्या या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक 7 नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीआधी होणारी ही बैठक. त्या दृष्टीनंही तिचं महत्व अधिक असेल.