Security Breach In Lok Sabha : हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2023) सुरु असतानाच संसदेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन एकाने सोबत आणलेला कलर स्प्रे (Color Spray) करून धूर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन थेट सभागृहातच आंदोलन केल्याने संसदेच्या सुरक्षेचा (Security Breach) मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, या घटनेवरून शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) राष्ट्रवादीकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. “संसदेची सुरक्षा ठेवता येईना, देशाची सुरक्षा कशी करणार" असा खोचक टोलाही राष्ट्रवादीच्या ट्वीट अकाऊंटवरून लगावण्यात आला आहे.
यावेळी करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की," देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आज घडलेल्या घटनेतून गांभीर्याने लक्षात आले. प्रेक्षक गॅलरीतून 2 अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून, एकच गोंधळ उडवला. ज्यामुळे लोकसभा सदस्यांना त्याचा त्रास भोगावा लागला.
देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा त्रुटी असणे म्हणजे केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांची देशाच्या सुरक्षिततेबाबत असणारी गांभीर्यता यातून लक्षात येते. पुन्हा सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते, सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच अपेक्षा, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दिल्लीतील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद...
लोकसभेतील घुसखोरीची घटना समोर आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तातडीनं पोलीस महासंचालकांना फोन करून, या घटनेतील आरोपी महाराष्ट्रातील असल्यानं त्यांची लवकरात लवकर माहिती घ्या असे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच, लोकसभेत समोर आलेल्या या घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. तसेच, विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे सचिवांनी आदेश दिले आहेत. या बरोबरच विधानसभा आणि विधानपरिषेदच्या प्रेक्षक गॅलरीत नव्याने पास देण्यात येऊ नयेत असेही आदेश देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: