नागपूर: शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद हवे होते. सत्तेत आल्यानंतर देखील सर्व पदं त्यांनाच हवी होती. त्यांच्याच मान्यतेने इतरांना पदं दिली गेली. त्यामुळे, सर्व जे काही करायचं ते अजित न करायचं विश्वास दाखवणे शरद पवार यांची सर्वात मोठी चूक ठरली. उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेते केलं, पक्षात काही निर्णय घ्यायचा आहे तर अजित पवारच घेतील ही बाब सर्वांना माहिती आहे. फक्त कोणी बोलत नाही आणि मी बोलण्याचा धाडस करतो," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
तर, अजित पवार यांना विरोधी पक्ष नेते करावे यासाठी जे आमदारांच्या सही असणारे पत्र होते, त्यावर सर्वच आमदारांनी सही केली नव्हती. अजित पवार यांनी काही आमदारांना एका पत्रावर सही करायला लावली आणि ते पत्र अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावे यासाठी शरद पवार यांना देण्यात आले. त्या पत्रावर माझी सही नव्हती, त्यामुळे सर्व आमदारांनी पत्रावर सही केली असं म्हणणं उचित नाही, असेही आव्हाड म्हणाले.
अजित पवारांनी पक्षात कोणालाच मोठं होऊ दिले नाही
तसेच, "मी देखील मला विरोधी पक्षनेते करावे असे एक पत्र शरद पवार यांना दिलं होतं. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी जे काही पत्र दिले, त्यावर केवळ अठरा-एकोणीस लोकांच्या सह्या होत्या. त्या काळात केवळ नऊ जणचं सर्व पदांसाठी हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी कधी वरती आलीच नाही. राजकारणात नवीन पिढी आली पाहिजे. शरद पवार नंतर तुम्ही राजकारणात आलात, कारण शरद पवारांनी तुम्हाला आणलं. परंतु, तुम्ही कोणाला राजकारणात आणलं सांगावं, केवळ मी आणि मी हेच तुम्ही केलं. पक्षात माझ्याशिवाय कोणी नाही एवढेच तुम्ही केलं, असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच, 2019 साली जे पत्र चोरण्यात आलं होतं, ते राष्ट्रवादीच्या कार्यालयातील गरजे नावाच्या लिपिकाने चोरले होते. तेच पत्र अजित पवार यांना नेऊन देण्यात आले. त्यावर 54 आमदारांच्या सह्या होत्या असेही आव्हाड म्हणाले.
तोंड दाबून बुक्क्याचा मार होता
नाशिकच्या एका नेत्याने अशी भूमिका मांडली, आपण शरद पवारांना बाजूला ठेवूया आणि भाजपसोबत जाऊयात. त्यावेळी एक पत्र लिहिण्यात आलं आणि ते शरद पवारांना देण्यात येणार होतं. त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, आम्ही भाजपसोबत जाणार आहोत. त्यावेळी अजित पवारांच्या तोंडावर त्यांना नाही म्हणण्याची माझी हिंमत नव्हती. तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. त्यावेळी मी पत्रावर सही केली, कारण ते पत्र शरद पवार यांना देण्यात येणार होतं. ते पत्र जयंत पाटील यांच्या हातात देण्यात आलं आणि ते शरद पवार यांना देण्यात यावं असं त्यांना सांगण्यात आलं. परंतु, जयंत पाटील यांनी आजपर्यंत ते पत्र शरद पवार यांना दाखवलं सुद्धा नाही, असे आव्हाड म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rohit Pawar: 'मी सही केलेलं पत्र चोरीला गेलं', रोहित पवारांचा गंभीर आरोप