सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात (Satara Politics ) आज मोठी घडामोड झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि महायुतीचे नेते शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात सातारा येथे भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. या भेटीची साताऱ्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. शंभूराज देसाई हे साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर, शशिकांत शिंदे यांनी यापूर्वी सातारा जिल्ह्यातील जावळी आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विकासकामं आणि इतर मुद्यांची भेटीत चर्चा झाल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.
शशिकांत शिंदे-शंभूराज देसाई यांच्यात भेट
सातारा येथे शशिकांत शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यात भेट झाली. शंभूराज देसाई यांनी शशिकांत शिंदे यांना आवाज दिला. यावर आमदार शिंदे यांनी मंत्री देसाई यांची गळाभेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते कार्यालयात गेले. दोन्ही नेत्यांमध्ये कमराबंद चर्चा झाली. या भेटीसंदर्भात शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली. कमराबंद चर्चा वगैरे काही नव्हतं पालकमंत्र्यांच्या कानावर काही विषय घातले होते. क्षेत्र माहुली येथे रेल्वेचा मार्ग आहे तिथं दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरु असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं शंभूराज देसाई यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होती, तेव्हा शंभूराज देसाई आले त्यामुळं त्यांना हा विषय सांगितला. या भेटीत राजकीय चर्चा काय करणार, ते महायुतीत मी महाविकास आघाडीत, असं शशिकांत शिंदे म्हणाले. मला ऑफर देऊन फायदा नाही हे सर्वांना माहिती आहे, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी, मतदार यादीतील आपल्या विरोधकांची नावं रद्द करण्याचा प्रकार सुरु आहे. यंत्रणांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करायचे, धमकी द्यायची आणि पक्ष प्रवेश करायचे, असा प्रकार सुरु झाला आहे. यासंदर्भात मी नाराजी व्यक्त केली आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले. नियम सर्वांना सारखा असावा, तो नियम बाजूला ठेवत काही लोकांवर पोलीस तत्परतेनं कारवाई करत आहेत. जर तक्रार खोटी असेल तर ज्यानं केलीय त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. प्रशासनानं कार्यकर्ता म्हणून काम करु नये, असं देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
इतर बातम्या :