पुणे : मावळमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या संजोय वाघेरेंच्या (Sanjog Waghere) समान नावाच्या नाशिकच्या व्यक्तीने अर्ज भरल्यानंतर आता आणखी एका संजोग नावाच्या व्यक्तीने अर्ज भरल्याचं स्पष्ट झालंय. रायगडमधील संजोग पाटील नावाच्या उमेदवाराने मावळमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे समर्थक त्यांच्यासोबत होते. त्यामुळं मत विभागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार बारणेंनींच ही खेळी केल्याचं आणि संजोग पाटलांना उरणमधून शोधून काढल्याचं बोललं जातंय. 


समान नावामुळे मतदारांमध्ये होणाऱ्या गोंधळाचा फायदा घेऊन ठाकरेंच्या उमेदवाराची मतं कमी करणाचं राजकारण सध्या मावळमध्ये जोरदार सुरू असल्याचं चित्र आहे. मावळ लोकसभेत उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरे पाटलांना निवडणुकीत उतरवलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या समान नावाच्या दोन उमेदवारांन आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती हा नाशिकमधील आहे तर दुसरा हा रायगड जिल्ह्यातील आहे.


अर्ज दाखल करताना खिशावरचा बिल्ला काढायचे विसरले


अर्ज दाखल करतानाचा संजोग पाटलांचा निवडणूक आयोगाने दिलेला फोटो हा या चर्चांवर शिक्कामोर्तब करताना ठरतोय. कारण फोटोत संजोग पाटलांसोबत असणाऱ्या एका व्यक्तीचं माऊली घोगरे असं नाव आहे आणि त्यांच्या खिशावर प्रचाराचा एक बिल्लाही दिसतोय. त्यावर शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणेंचाही फोटो आहे. 


श्रीरंग बारणेंचे निकटवर्तीय अर्ज भरण्यासाठी उपस्थित


माऊली घोगरे हे श्रीरंग बारणेंचे निकटवर्तीय आहेत हे अधोरेखित करणारे जुने फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत. त्यात बारणे, उद्धव ठाकरे आणि घोगरे सोबत आहेत. तसेच लोकसभेच्या प्रांगणात ही बारणे-घोगरेंनी सोबत फोटो काढलाय. त्यामुळे घोगरे हे बारणेंच्या किती जवळचे समर्थक आहेत हेही स्पष्ट होतं. हे पाहता मविआ उमेदवार संजोग वाघेरे पाटलांच्या नावाचा साधर्म्य असणारा व्यक्ती शोधून, त्याला मावळ लोकसभेत उतरवण्याची ही खेळी बारणेंची असल्याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे. 


कोणतीही निवडणूक असो, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांची विभागणी करण्यासाठी अशा खेळी केल्या जातात. त्यामागे विरोधकांची खेळी असते असं अनेकदा बोललं जातं. पण यावेळी थेट पुरावाच समोर आल्यानं, यामागे श्रीरंग बारणेंचा हात आहे हे म्हणायला बराच वाव आहे. दुसरीकडे नाशिकच्या संजय वाघेरे नावाच्या उमेदवाराने ही अपक्ष अर्ज दाखल केलाय. पण आता संजोग पाटलांप्रमाणे संजय वाघेरेंना ही श्रीरंग बारणेंनीचं मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे का? असा ही प्रश्न चर्चिला जातोय. 


2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी ही श्रीरंग बारणे आणि दिवंगत लक्ष्मण जगताप नावातील साधर्म्य असणारे काही उमेदवार रिंगणात होते. त्यावेळीही या दोघांनी एकमेकांविरोधात अशी खेळी केली होती.


शिरूर लोकसभेत 2009 साली त्यावेळी शिवसेनेत असणाऱ्या शिवाजी आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडेंच्या नावातील साधर्म्य असणारा उमेदवार शोधला होता. त्या अपक्ष उमेदवारास चौदा हजाराच्या आसपास मतं पडली होती. यावेळी विरोधी उमेदवारांनी ही खेळी केली अशी फक्त चर्चा रंगली होती, त्यावर शिक्कामोर्तब करणारा पुरावा मात्र नव्हता. यावेळी मात्र बारणे समर्थक माऊली घोगरे खिशावरचा बिल्ला हटवायला विसरले अन फसले.


ही बातमी वाचा: