Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे बुधवारी भाजपचे (BJP) विले पार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी (Parag Alavani) यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यादरम्यान एकत्र आले होते. या भेटीत शिवसेना-भाजप युती होईल हा माझ्यासाठी सर्वात मोठा सुवर्णक्षण असेल, असे म्हटल्याने भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत. चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासून शिवसेना- भाजप युतीचे समर्थक राहिले आहेत. विशेषतः शिवसेना-भाजप युतीच्या जुन्या पिढीत चंद्रकांत दादांसारखे नेते होते. आता भाजपमध्ये बाहेरून जे हौशे-नौशे-गौशे आलेले आहेत त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचे महत्त्व कळणार नाही.
आम्ही चंद्रकांत पाटलांचे आभारी
चंद्रकांत पाटील यांच्या जशा भावना आहेत, तशा त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत. कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तमरीतीने काम केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आम्ही चांगल्या पद्धतीने काम केले आहे. पण, सगळ्यांना माहित आहे की, दिल्लीमध्ये अमित शाह यांचा उदय झाल्यावर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट आले. चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा
संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीत गेलो त्याला कारण भारतीय जनता पक्षातील काही लोकांचा हट्ट आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो. पंचवीस वर्षाची आमची युती ज्या कारणासाठी तुटली ती कारणे जर आपण पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला. जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, तेव्हा अमित शहा यांनी ती मागणी नाकारली. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती, त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत गुंतले होते. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायची होती आणि आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
राजकीय मार्केटिंगसाठी कुंभमेळ्याचा वापर
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली. यात किमान 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, 144 वर्षांनी येणारा हा पवित्र योग कुंभमेळ्यात होता. त्यामुळे गर्दी होणार हे प्रशासनाला माहीत होतं. कुंभमेळ्याचं मार्केटिंग करण्यात आले. व्हीव्हीआयपींनी यावेळी दूर राहिले पाहिजे पाहिजे. अमित शाह आले, संरक्षण मंत्री आले की, सगळा तो परिसर बंद करताय अशी माहिती आहे. स्नानासाठी लाखो भाविक पोहचू शकले नाही आणि गर्दीत ही चेंगराचेंगरी झाली. राजकीय मार्केटिंगसाठी कुंभमेळ्याचा वापर झाला, असा आरोप त्यांनी केला.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करणार?
संजय राऊत पुढे म्हणाले की, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अनेक लोकं अजूनही बेपत्ता आहेत. 10 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च झाला, असे म्हणताय. माझ्या माहितीनुसार 1 हजार कोटी रुपये खर्च झालेत. 9 हजार कोटी रुपयांचा हिशोब लागणार नाही. आता भाजपचे चार्टर्ड अकाउंटंट किरीट सोमय्या यांना तिथे पाठवले पाहिजे. हे भाजप सरकार आणि योगी सरकारचे फेल्युअर आहे. आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा