बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आल्यानंतर ते गुरुवारी पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये पोहोचले. यावेळी अजित पवार यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे जातीने हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याठिकाणी मोठी गर्दी केली होती. याशिवाय, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितही अजितदादांच्या स्वागताला उपस्थित होते. अजित पवार आता बीडच्या (Beed News) शासकीय विश्रामगृहावर जातील. यानंतर ते पालकमंत्री म्हणून बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीला हजेरी लावणार आहेत.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. कारण या बैठकीला अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे या बैठकीला धनंजय मुंडे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतील, असे सांगितले जात होते. मात्र, धनंजय मुंडे प्रत्यक्षात या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची नवी माहिती आता पुढे आली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर सातत्याने आरोप करणारे सुरेश धस हेदेखील बैठकीला उपस्थित असतील. धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना विकासकामांची तब्बल 70 कोटींची बोगस बिले काढण्यात आली, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत अजित पवार, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे नेते आमनेसामने आल्यावर काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान, अजित पवार बीडमध्ये आल्यानंतर त्यांचे स्वागत करताना धनंजय मुंडे उत्साहात दिसत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांनी हसतखेळत संवाद साधताना दिसून आले. धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महायुती अंतर्गत दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्याची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. योगायोगाने या काळात देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीत होते. धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
आणखी वाचा
धनंजय मुंडे दिल्लीत, राजीनाम्याचा निर्णय दिल्ली दरबारी?; राजकीय दबाव वाढला, नेमकं काय घडतंय?