मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. पुढील काही दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्यातच महायुतीला (Mahayuti) एका मागे एक धक्के बसत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) जाण्याचा निर्णय घेतलाय. आज ते तुतारी हाती घेणार आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी येतात. पण बहिणी कुठे आहेत? तिथे खुर्च्या रिकामा आहेत. बहिणींना माहित आहे की, दोन तीन महिन्याच्या वर हे सरकार राहत नाही. हे मुख्यमंत्री राहत नाही. सरकार बदलणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळतील ती घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. ठेकेदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीये. 50 हजार कोटींची देणी थकलेली आहे आणि उधारीवर काम सुरू आहे. लहान-मोठे ठेकेदार मंत्रालयात बसून आहेत. त्यांच्याकडून कामाच्या बदल्यात 40 टक्के कमिशन घेतले आहे. पण त्यांची बिल अद्याप मिळालेली नाही. एकनाथ शिंदे यांचे 40 टक्के कमिशन आहे. त्यांचे चिरंजीव 20 टक्के आहे आणि खालचे इतर सगळे दहा टक्के आहेत. त्यामुळे 60 टक्के कमिशन ठेकेदारांकडून आधीच वसुली केले जातात. या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार आणि कामगार कंगाल झालेले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राची दिवशी अंधारात जाण्याची भीती
महाराष्ट्राची दसरा दिवाळी अंधारात जाणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, बोनस नाही, पोलिसांना पगार नाही, शिक्षकांचे पगार होणार नाही, अंगणवाडी सेविकांचे पगार होणार नाही, लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा वर्गाच्या दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे. कारण या सरकारला कुठलीही निती आणि दिशा नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग होणार
महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार आहे तसेच महाविकास आघाडीत मोठा इनकमिंग सुरू आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काल डोंबिवलीतील तरुण कार्यकर्ते दिपेश म्हात्रे हे पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे. हे सगळे लोक शिवसेनेसोबत विधानसभेत काम करतील आणि आमची जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील, असे सुतोवाच त्यांनी यावेळी केली.
हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश मविआसाठी शुभशकुन
हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी महाविकास आघाडीत येणे हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकुन आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है, कळेल कोण कुठे आहेत आणि कोण कुठे जात आहेत ते. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी महाविकास आघाडीत येण्याचा प्रवाह कसा वाढतोय ते तुम्हाला दिसून येईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
त्या दिवशी तुम्ही भिडण्याची भाषा करणार नाही
उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांचा कार्ट म्हणून उल्लेख केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बापाशी भिडा, याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांचे भिडू, चिंता करू नका आताही आम्ही भिडतच आहोत. मोदी आणि शाहांची कवच कुंडलं आहेत म्हणून तुमचा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी तुमचं कवच कुंडल जातील त्या दिवशी भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. उद्धव साहेबांनी जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाबाबत केलंय. त्यांच्या चिरंजीवांचे प्रताप काय आहेत हे त्यांच्या वडिलांनी एकदा समजून घ्यावेत, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
आणखी वाचा