नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते गडकरींच्या फोन कॉलमुळे घरी शांत बसून राहिले होते, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केला. काँग्रेसचे हे नेते दिवसा पक्षाचा प्रचार करायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधायचे, असा दावा विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी केला. विकास ठाकरे यांनी यंदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या लढाईत विकास ठाकरे यांचा तब्बल लाखभरापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीला (Loksabha Election 2024) काही महिने उलटल्यानंतर आता विकास ठाकरे यांनी काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. 


लोकसभा निवडणुकीत नागपुरात काँग्रेसचे काही नेते नितीन गडकरी यांच्या फोन कॉलमुळे घरी शांत बसले होते. तर काही नेते दिवसभर माझ्यासोबत फिरायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवर बोलायचे. अशा सर्व नेत्यांची यादी आमच्याकडे असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत कोणी काम केले, कोणी काम केले नाही, अशा सर्वांची यादी आपल्याकडे आहे. मात्र, मी त्या सर्वांना माफ केले आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीमध्ये माझी नजर त्या सर्वांवर राहील. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांशी जो कोणी गद्दारी करेल, त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी  विकास ठाकरे यांनी केली.


नागपुरात आम्ही सत्तर लोकांनी पक्षाची उमेदवारी मागितली असली तरी फक्त सहा जणांना उमेदवारी मिळेल. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहण्याची गरज असल्याचे सांगताना विकास ठाकरे यांनी संभाव्य बंडखोरांना सक्त ताकीद ही दिली. काँग्रेस मधील जे कोणी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहेत, अशा नेत्यांना सांगणं आहे की त्यांनी नीट विचार करुन निर्णय घ्यावा, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला. ते नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दिल्लीतील हायकमांड काही पावले उचलणार का, हेदेखील पाहावे लागेल.


आणखी वाचा


हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे


नितीन गडकरी जिंकले असले तरी मी फडणवीसांच्या मतदारसंघातील मताधिक्य अर्ध्यावर आणलं, हा माझा नैतिक विजय : विकास ठाकरे