मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने (Court) दोषी ठरवले आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याचे काम मिळाले होते. त्या कामात भ्रष्टाचार किंवा घोटाळा झाल्याचा आरोप मी केलेला नाही. हा आरोप सर्वात पहिले मीरा-भाईंदर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला आहे. त्यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यावर मीरा-भाईंदर महापालिकेचा कामामध्ये गडबड आहे, असा एक अहवाल देखील आहे. त्यानंतर तेथील आमदार प्रताप सरनाईक त्यांनी राज्य सरकारला या घोटाळ्यासंदर्भात एक पत्र लिहिलेले आहे आणि चौकशीची मागणी केलेली आहे. विधानसभेत याबाबत प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेत आदेश पारित करण्यात आला.
मी केवळ प्रश्न विचारले
यात मी केवळ लोकांसमोर हा मुद्दा आणला. मी केवळ प्रश्न विचारले. यात मी अब्रुनुकसान कुठे केली? मग पहिले अब्रुनुकसान ही प्रवीण पाटील यांनी केली. दुसरी मीरा-भाईंदर नगरपालिकेने, तिसरी प्रताप सरनाईक यांनी आणि चौथी राज्याच्या विधानसभेत केली. पण मी सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, असे मला दिसल्यावर मी प्रश्न उपस्थित केला. आज मला पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांनी मला पंधरा दिवस काय, पंधरा वर्षे शिक्षा ठोठावली असती तरी मी सत्य बोलण्याचे थांबवणार नाही. आम्ही आता वरच्या कोर्टात अपील करत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
तिकडे आम्हाला काय न्याय मिळणार?
सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे. जनतेचा पैशाचा अपहार होत आहे. त्या संदर्भात आम्ही काही बोलायचे नाही का? न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे मोदक खायला आपल्या घरी पंतप्रधानांना बोलवतात आणि पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला जातात तिथे आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आणखी वाचा