मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभा सुरु आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे (Mahayuti) मेळावे सुरु आहेत. महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) उल्लेख केला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. मात्र, भाजपचे आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Savarkar) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स या समाज माध्यमावर टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारला डिवचले आहे. 

मविआ सरकार योजनेतील त्रुटी दूर करणार : रोहित पवार

रोहित पवार म्हणाले की, केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजनेचा जुगाड केल्याचे खुद्द भाजपा आमदारांनीच सांगितले आहे. सरकार मतांसाठी लाडकी बहीण म्हणत असेल तरी सरकारची भावना मात्र सावत्र भावाप्रमाणे स्वार्थीच असल्याचं यावरून स्पष्ट होते. असो, सावत्र भावांनी केवळ मतांसाठी योजना आणली असली तरी मविआ सरकार या योजनेतील त्रुटी दूर करून भरघोस निधीची तजवीज करून योजना अधिक सक्षमपणे राबवेल. तसेच लाडक्या बहिणींना सुरक्षा, त्यांच्या मुलामुलींसाठी नोकऱ्या, शेतमालाला चांगला भाव यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या स्वार्थी सावत्र भावांच्या सरकारमध्ये नाहीत त्यावर सुद्धा मविआ सरकार काम करेल.

नेमकं काय म्हणाले होते टेकचंद सावरकर?

आम्ही इतकी मोठी भानगड कशासाठी केली? हे तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, यासाठी आम्ही हा जुगाड केलाय. हे सर्वजण खोटे बोलले असतील. मात्र, मी खरे बोलतो. माझे बोलणे खरे आहे की नाही? नाहीतर बोलायचे एक आणि करायचे एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का? असे त्यांनी म्हटले होते. 

टेकचंद सावरकरांचे स्पष्टीकरण

लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यानंतर टेकचंद सावरकरांनी सारवासारव केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, एका मेळाव्यातील माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला. माझा असा कोणताही उद्धेश नव्हता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे. मी एकट्याने काही म्हटले तर काहीही होणार नाही. सुनील केदार यांनी दोन दिवसांपूर्वी या योजनेबाबत बोलताना म्हटले होते की, माझे सरकार आले तर मी पहिले काम कोणते करेन तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचे काम करेन. आता खरं तर काँग्रेसकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे काँग्रेसने माझ्या भाषणाची तेवढीच क्लिप व्हायरल केली, असे टेकचंद सावरकर यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा