मुंबई: अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं दोषी ठरवले आहे. मेधा किरीट सोमय्या (Medha Somaiaya) यांनी हा खटला दाखल केला होता. ज्यात संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही आकारण्यात आलाय. किरीट आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान संजय राऊत वारंवार अनुपस्थित राहिल्यानं दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावलं होतं. या सुनावणीत न्यायालयानं मेधा सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला होता.


काय आहे शौचालय घोटाळा?


साल 2022 मध्ये मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालयं बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांवर संजय राऊत यांनी केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झालेला आहे. तसेच 'घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत?, पुरावे कुठे आहेत?, हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानंच केलेला हा घोटाळा' असल्याचं संजय राऊत एकदा म्हणाले होते.


रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता प्रदर्शनी राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल रोजी मेधा सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांनी केलेलं विधान मोठ्या प्रमाणात लोकांनी ऐकलं आणि वर्तमानपत्रातूनही वाचलेआहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचंहा त्यांनी पुराव्यातून म्हटलेलं आहे. त्यामुळे याचिकेतील कलम 499 (मानहानी) 500 (गुन्ह्याची शिक्षा) शिक्षा स्पष्ट करत असल्याचेही न्यायालयाने याआधी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.


कोर्टाच्या निकालानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...


सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की, आजही भारतातील न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. माझ्या कुटुंबाला , माझ्या मुलाला कोणी इजा करायचा प्रयत्न केला तरी एक सामान्य गृहिणी कशी लढेल, तशीच मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असे वाटते. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्त केली.



आणखी वाचा


सोमय्यांच्या पत्नीने अब्रुनुकसानीचा खटला जिंकला, संजय राऊत दोषी असल्याचा निकाल, 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा