Sanjay Raut on Hindi Language Compulsory : इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीची केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्रिभाषा सूत्रा’संदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतर संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री या विषयावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व संबंधित घटकांशी चर्चा झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमधील स्थिती जनतेपुढे मांडली जावी, जेणेकरून राज्याच्या हिताचा निर्णय घेता येईल, असे सूचित केले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Continues below advertisement


संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे. आधी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश हे जे हिंदी भाषिक राज्य आहेत. तिथे हिंदी भाषेवर काम करणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी भाषा संपन्न आहे. आम्हाला हिंदी शाळेत शिकावे लागले नाही. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये हिंदी शिकवावी लागत नाही. मराठी सोबत इथे हिंदी आहेच. शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करत आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात कोणाला वाढवायचे आहे? त्यांनी मराठी माणसाचा विचार करावा. त्यांनी मराठी भाषेचा विचार करावा. मराठी शाळा अभिजात कराव्यात पण त्यांचे काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज 


संजय राऊत पुढे म्हणाले की,  भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचे हेडक्वार्टर असलेल्या गुजरातमध्ये हिंदी सक्तीची केलेली नाही आणि हे स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडीला मांडी लावून बसत आहेत. आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना, असे सांगताय तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना प्रश्न विचारा. दाखवा हिंमत की, गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि आमच्या मुंबई महाराष्ट्रावर हिंदी का लादत आहात. हे विचारण्याची हिंमत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगलबच्चांमध्ये आहे का? असे आव्हान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. 


देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रूच


कसल्या बैठका घेत आहात? काल म्हणे बैठक झाली. एक आदेश काढा आणि हा विषय संपवून टाका. बैठका घेत सुटले आहेत. वातावरण बिघडवत आहेत. तुम्हाला काय दाखवायचे आहे? या बैठका घेऊन महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करत आहात. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एक तरी बैठक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही घेतली आहे का? पण हिंदीसाठी बैठका सुरू आहेत. चर्चा आणि गुप्त बैठका सुरू आहेत. मुंबई महापालिकेच राजकारण करत आहात का? इथल्या हिंदी भाषिकांना तुम्ही चिथवताय का?  तुम्ही हे कुणासाठी करताय? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू सारखे वागू नका, तुम्ही महाराष्ट्राचे शत्रूच आहात, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.  


फडणवीसांना दहा साहित्यिकांचे नाव माहित आहेत का? 


संजय राऊत पुढे म्हणाले की, साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांचे नाव माहित आहेत का? एकनाथ शिंदेंना पाच साहित्यिक माहीत आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात इतकी चिंता असती तर हा जो दबाव सुरू आहे हिंदी भाषेचा त्यावर साहित्यिक आतापर्यंत उठले असते. आता नाना पाटेकर कुठे आहेत? प्रशांत दामले कुठे आहेत? माधुरी दीक्षित आणि मराठी क्रिकेटपटू कुठे आहेत? मराठी माणसांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे. पण, मराठीवर असे हल्ले होत असताना तुम्ही गप्प आहात. फडणवीस जी आम्हाला साहित्यिकांचे सांगू नका, आम्हाला माहित आहे. 90 टक्के लोक जे पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत, असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  



आणखी वाचा 


Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: मनसे-सेनेची युती न झाल्यास मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही; प्रकाश महाजन मनातलं सगळं बोलून गेले!