Abu Azmi on Pandharpur Palki Statement: महाराष्ट्रतील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर वारी पालखीबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापलं होतं. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती. भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनीही अबू आझमी यांच्या विधानावर टीका करत त्याला सांप्रदायिक मुद्दा बनवला होता. यानंतर सपाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे, त्याचबरोबर त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना लिहिले की, "सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझं वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर करण्यात आले आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता", असंही पुढे अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हटलं की, "मी एक समर्पित समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो." सपा आमदार म्हणाले, "मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कांविरुद्ध भेदभावाच्या संदर्भात केला होता. ही कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती."
पंतप्रधान मोदींबद्दल त्यांनी काय म्हटले?
ते म्हणाले, "माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधून घेणे होता की त्यांच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात 'सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास.' पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले, "आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेला कधीही बाधा पोहोचू देणार नाही."
नेमकं काय प्रकरण?
सोलापुरात (Solapur) वारीसंदर्भाने (Wari) आझमी यांनी वक्तव्य केलं होतं. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही, मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळं रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे आझमी म्हणाले होते.
आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.