मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर आता महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महाविकास आघाडीला घराचा आहेर दिलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेना आणि काँग्रेसला टोला लगावलाय. तर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाला जागावाटप कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
संजय राऊत म्हणाले की, जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीने लांबवली गेली त्याची गरज होती का? ती का, कोणामुळे आणि कशी लांबली? हे बहुतेक वडेट्टीवार यांना माहीत असावे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप संपलेलं नव्हतं, हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झाले तर एक अस्वस्थता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. महायुतीमध्ये दोन महिन्यांपूर्वीच जागावाटप संपलेलं होतं. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या आहेत आणि त्या स्वीकारल्या पाहिजे. चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाले हे आता आम्हाला कळत आहे. तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवारांनी विदर्भात काही जागा सोडल्या असत्या, तर...
महाविकास आघाडीत तब्बल २० दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला, असे म्हणत विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व खासदार संजय राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आमच्यात नक्कीच वाद सुरु होता. पण वाद त्या पद्धतीचा नव्हता. जागा वाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे. काँग्रेसला सर्वात जास्त जागा हव्या होत्या आणि त्यांच्या सर्वात कमी जागा निवडून आल्यात. विदर्भात वडेट्टीवारांनी काही जागा सोडल्या असत्या, ज्या ते हरलेत तर चित्र काहीसं वेगळं असतं. चंद्रपूरची जागा किशोर जोरगेवार राष्ट्रवादीतून लढणार होते. यासाठी १७ दिवस राष्ट्रवादीने प्रयत्न केले. पण काँग्रेसने ही जागा सोडली नाही. अखेर किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा