Nitin Raut on Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मोठे यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मोठा फटका बसला. यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला (Congress) घरचा आहेर दिलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या. जमिनीवरील राजकीय स्थितीकडे मात्र दुर्लक्ष केले, असे त्यांनी म्हटले आहे.  


लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही (महाविकास आघाडी) फक्त वाटाघातीत वेळ घालवले. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणूकीकडे आम्ही दुर्लक्ष केले, अशी स्पष्ट कबुली काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे. नितीन राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


पराभवानंतर आम्हाला मान्य करावेच लागेल


नितीन राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतरच्या आमच्या हालचाली लक्षात घेतल्या तर स्पष्ट दिसते की, आमचा वाद मुख्यमंत्रीपदासाठी होता, आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करत राहिलो. जमिनीवर काय चित्र आहे याकडे दुर्लक्ष करत आम्ही गाफील राहिलो. हे पराभवानंतर आम्हाला मान्य करावेच लागेल आणि ते मान्य केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


तोच आमचा गाफीलपणा होता


विधानसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अनेकांच्या मुख्यमंत्री होण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षा बळावल्या होत्या का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, होय, तोच तर आमचा गाफीलपणा होता, असे नितीन राऊत म्हणाले. काँग्रेसमध्ये लवकरच हाय कमांडकडून संघटनात्मक बदल केले जातील. विधिमंडळ पक्षनेता, विधानसभा गटनेता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या तिन्ही पदांसाठी हाय कमांडकडून लवकर निर्णय होतील, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


शरद पवारांनी आरएसएसचे कौतुक केलेले नाही


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता नितीन राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी महायुतीच्या विजयासंदर्भात संघ स्वयसेवकांच्या कार्याचा उल्लेख करताना संघाचे कौतुक केलेले नाही. तर जे काम संघ एक संघटन म्हणून करू शकते, तेच काम आपले कार्यकर्ते का करू शकत नाही? असं एक उदाहरण त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवले असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी: शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंकडून 7 जणांना संपर्क