Devendra Fadnavis : 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election) भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) महायुती म्हणून लढली होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मोठं भाष्य केलं आहे. 2019 हे वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
2019 साली भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीला 161 जागा मिळाल्या. त्यात भाजपाने 105 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन आग्रह सुरु केला. यानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र, अजित पवार हे शरद पवार यांच्याकडे गेल्याने हे सरकार केवळ 72 तास चालले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस यांना 105 आमदारांसह विरोधक म्हणून बसण्याची वेळ आली होती. आता यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
...तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मागील दहा वर्षात 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. 2019 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण त्यामुळे विकासाच्या गतीला खिळ बसली होती. 2022 नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता दाव्याने हे सांगतो की, महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मला आव्हानांची चिंता वाटत नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून मी अनेक आव्हानांचा सामना केलाय. त्यातून आता परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही. आपण मल्टिटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलत असताना, आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचे असा माझा प्रयत्न असणार आहे. मागील दहा वर्षामध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय म्हणतात तसं झालं आहे. मला आलेले अनुभव तसेच आहेत. दहा वर्षांपूर्वी लोक संशयाने बघायचे की हा व्यक्ती कधी मंत्रिपदावरही आला नाही आणि मुख्यमंत्री झाला तर हा काही करु शकेल का? पाच वर्षांच्या पूर्ण कार्यकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा लोकांनी मी काय करु शकतो किंवा माझी क्षमता काय ते बघितलं, अनुभवलं, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा