Maharashtra Political Crisis: ''सदा सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर फार मोठा आक्रोश मोर्चा काढला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मलाही बोलावण्यात आलं होतं. पण दुसऱ्या दिवशी ते पळून गेले. छातीत दुखत आहे सांगत रुग्णालयात दाखल व्हायचं आहे म्हणाले आणि घरी गेले. नंतर घरातूनच मागच्या दारातून पळून गेले. एकटे सरवणकर असे आहेत का, तर नाही. दोन दिवसांपूर्वी काही प्रमुख मंत्री वर्षा बंगल्यावर आमच्यासोबत बसून पुढील काही योजनांवर चर्चा करत होते. दुसऱ्या दिवशी यातील गुलाबराव पाटील, दादाजी भुसे हे सर्व वरिष्ठ मंत्री अचानक तिथे (गुवाहाटीला) निघून गेले. गुलाबराव पाटील हे शिवसेनेतील सर्वात जुने नेते. त्यांची भाषणं ऐकली तर ते म्हणायचे, माझ्यासारख्या पानटपरी चालवणाऱ्याला शिवसेनेने कसं मोठं केलं. आमदार केलं, जिल्हा मंत्री बनवलं, राज्य मंत्री बनवलं. कॅबिनेट मंत्री केलं, हे महाशय स्वतःच सांगतात आणि पळून जातात'', असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत. 


हिंदुत्व हा शब्द तरी लिहिता येतो का? भुमरे यांच्यावर राऊत कडाडले


संजय राऊत या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ''संदीपान भुमरे सहावेळा आमदार झाले. त्यांना पहिल्यांदा तिकीट मिळावं म्हणून मी शिवसेना प्रमुखांशी थोडासा वाद केला होता. मोरेश्वर साबळे यांचं तिकीट कापून त्यांना द्यायला लावलं. त्यावेळी हे महाशय पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात चौकीदार म्हणून काम करत होते. ते आज कॅबिनेट मंत्री आहे. यांना काय कमी दिलं शिवसेनेने, कुठलं हिंदुत्व सांगत आहेत हे आम्हाला. यांना हिंदुत्व हा शब्द तरी लिहिता येतो का? भुमरे यांनी शब्द लिहून दाखवावा हिंदुत्व आणि बोलून दाखवावा. हे सर्व यांना शिवसैनिकांनी वर्गणी आणि खिशातून पैसेकाढून निवडून आणलं आहे. मात्र हे परत निवडून येणार नाहीत.''    


16 बंडखोर आमदारांवर ईडीची कारवाई सुरू होती 


ईडीच्या कारवाईवरून राऊत म्हणाले की, ''हे जे आमदार (बंडखोर) आहेत, त्यातील 16 लोकांवर ईडीची कारवाई सुरू आहे. आता मला माहित नाही की, त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं दिल्लीला नेहून... स्वच्छ केले आणि ते भाजपमय झाले. त्यांना दिल्लीला बोलावलं (बंडखोर आमदारांना) या सगळ्यांना, त्यातील एका आमदाराने मला स्वतः फोन करून सागितलं. ते ठाण्यातील माझ्या जवळचे आमदार आहेत. सकाळी मी त्यांना विचारलं कुठे आहेत तुम्ही, तर ते म्हणाले, मी सुप्रीम कोर्टात कामासाठी आलो आहे. मग मी विचारलं तुम्ही येत आहात का मुंबईला? तेव्हा ते म्हणाले, हो मी संध्याकाळी येत आहे. तोपर्यंत काही आमदार सुरतला गेले होते. तीन वाजता त्यांचा मला निरोप आला. त्यांनी मला निरोप देण्यास सांगितलं की, ते भाजपमध्ये जात आहेत. त्यांची ईडीची केस क्लिअर केली. देवेंद्र फडणवीस त्यांना अमित शाह यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांची केस क्लिअर झाली, असा त्यांनी मला निरोप दिला.''


संजय राऊत म्हणाले, ''ज्या आमदाराविरोध किरीट सोमय्या गेले एक वर्ष रोज पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांना तुरुंगात टाका सांगत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांची अनेक प्रकरणं बाहेर कढत आहे, ते एका तासात दिल्लीला जातात आणि त्यांची सर्व केसेस क्लिअर केले जातात. दुसरे यशवंत जाधव ज्यांच्या विरुद्ध सोमय्या रोज पत्रकार परिषद घेत होते आणि त्यांचा निरोप आला माझं सर्व क्लिअर झालं, आता मी जातो.'' 


संबंधित बातम्या: 


Sanjay Raut Majha Katta Highlights : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री ते बंडखोरांची मंत्रीपदं 24 तासांत जाणार, माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे