Eknath Shinde Supporters Rally : ''आज महाराष्ट्रात मोठी घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदार आहेत. ही इतिहासामधली पहिली मोठी घटना असेल, जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी विश्वास एकनाथ शिंदे यांना दाखवला'', असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. आज ठाण्यात शिंदे समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. ठाण्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्याच्या रस्त्यावर उतरलेले दिसले.    


यावेळी जमलेल्या लोकांना संबोधित करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ''अडीच वर्ष जी अनैसर्गिक आघाडी झाली. या आघाडीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे. असं का वाटलं? कोणाचा तरी यामध्ये दोष असेल. कोणालातरी याचा त्रास होत असले. एकट्या शिंदे यांना त्रास होत असेल किंवा पाच लोकांना होत असेल. मात्र 50 लोकांना त्रास कसा होऊ शकतो. याचा विचार झाला पाहिजे'' ते म्हणाले, ''गेल्या अडीच वर्षांमध्ये या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. लोकांना अपेक्षा होती, कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की, आमचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्या प्रमाणे आम्हालाही चांगले दिवस येतील.'' 


संपूर्ण ठाणेकर आणि शिवसेना कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत : श्रीकांत शिंदे 


श्रीकांत शिंदे म्हणाले की, ''पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सर्व खासदारांना शिवसंपर्क अभियानासाठी पाठवलं. या अभियानांतर्गत आपली सत्ता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली की नाही, त्यांची काय परिस्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी पाठवलं. मी आधी परभणीला आणि नंतर साताऱ्याला गेलो. तिकडे गेल्यानंतर परिस्थिती जी ऐकली, तिथले आमदार जे म्हणाले ते मी ऐकलं. मी सामान्य कार्यकर्ता नाही तर आमदारांचा रडगाणं सांगत आहे. काय म्हणाले आमदार, आम्हाला निधी मिळत नाही. आमच्या विधानसभा क्षेत्रात भूमिपूजन हे राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. आम्हाला जर निधी मिळाला, तर ते थांबवण्याचं काम राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. अशा परिस्थिती आम्ही काम करू शकत नाही. जर आमची सत्ता असून आम्ही लोकांना न्याय देऊन शकत नाही, तर काय फायदा अशा सत्तेचा.'' तत्पूर्वी संपूर्ण ठाणेकर आणि शिवसेना कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं ते म्हणाले होते.