Sanjay Raut on BJP : भाजपची (BJP) भूमिका हुकूमशाहीची, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची ताकद परावलंबी असून छोट्या पक्षांना संपवण्यावर त्यांचं लक्ष आहे. लोकशाही टिकावी यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन समाज पक्ष एकत्र येणार असून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर लक्ष लागल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.


'लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न'


संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपवर कडकडून टीका करताना म्हटलं की, ''फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्ष संपवून टाका, ही राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भाषा होती. पण, त्याचं नड्डांना आता लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. अनेक लहान-लहान पक्ष बरोबर घेऊ त्यांना परत एनडीए उभारणी करावी लागत आहे. देशातून लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, ही मोदी-शाहांची विचारसरणी आहे. या विचारसरणी विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. वंचितला सन्मानाने आम्हीसोबत घेतलं आहे. संविधान वाचवण्याच्या लढण्यात ते आमची साथ देतील.''


'...तर संपूर्ण देश भाजप मुक्त होईल'


संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, 'इतर पक्ष संपवणे शक्य नाही, कारण देशात लोकशाही आहे. बावनकुळे सांगतात लहान पक्ष संपवा, पण 2024 मध्ये तुमचा पक्ष राहतोय का बघा. 2024 नंतर भाजप राहणार नाही, तर काँग्रेसमय झालेला पक्ष आहे. आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल. 303 खासदारांपैकी फक्त 103 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी काँग्रेस आणि इतर पक्षांचे आहेत. या सर्व खासदारांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर हा देशच भाजप मुक्त होईल.'


संजय राऊतांचा बावनकुळेंवर घणाघात


संजय राऊतांनी पुढे म्हटलं की, 'भाजपाला लोकशाही देशातील नष्ट करायचे आहे स्वतंत्र्य नष्ट करायचे आहे. ही मोदी-शाहांची विचारसरणी आहे. मोदींचा भाजप आणि त्यांची पिलावळ हे देशाचे संविधान मानायला तयार नाही, हे स्पष्ट आहे. बावनकुळे जे म्हणत आहेत ते लोकशाही त्यांच्या बापाच्या त्यांनी आणलेली आहे का काही वर्षांपूर्वी हेच जेपी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा वक्तव्य केलं होतं, तो म्हणजे भाजप. आज त्याच जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकांसाठी दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत.'


'तुम्ही किती म्हणालात की, याला त्याला संपवू पण ते शक्य होणार नाही. या देशात लोकशाही आहे. 2024 नंतर तुमचा पक्ष काँग्रेसमय झालेला असेल. आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीच भाजप संपून जाईल. सगळ्या आमदार खासदारांनी जर ठरवलं तर एका रात्रीच संपून जाईल भाजप', असं राऊतांनी म्हटलं आहे.