Shiv Sena UBT Candidates List Lok Sabha Election 2024 :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर (First List Of Shiv Sena UBT Candidates) झाली आहे. पहिल्या यादीत शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार आणि जुन्या चेहऱ्यांसह नवीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून आता दुसरी यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटांकडून आणखी  पाच जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले नाहीत. त्यापैकी काही मतदारसंघ हे वंचित बहुजन आघाडीला सुटू शकतात.  वंचितसोबतची चर्चा अद्यापही पूर्ण झाली नाही. 


>> ठाकरेंकडून 17 जागावरील उमेदवार जाहीर 



ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर न केलेल्या जागा कोणत्या?


महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेनुसार, शिवसेना ठाकरे गटाला 22 जागा सुटल्या असल्याची चर्चा आहे. त्यापैकी 17 जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. तर, पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 


ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. या मतदारसंघातून उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. त्याशिवाय, जळगाव, पालघर, हातकंणगले, उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आल्या नाहीत.  जळगावमधून ललिता पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांचे नाव चर्चेत आहेत. तर, हातकंणगलेमधून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा विचार सुरू आहे. मात्र, त्यासाठी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावं अशी अट घालण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघदेखील शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा विचार सुरू आहे. असे झाल्यास या ठिकाणाहून विनोद घोसाळकर हे उमेदवार असू शकतात.  प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा यशस्वी झाल्यास या पाचपैकी दोन मतदारसंघ वंचितसाठी सोडले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.