मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक असे दावे केले आहेत. देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे. त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पराभव दिसत होता, त्या त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रविंद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून गायब करण्यात आला, असा दावा करत त्यांनी वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
निवृत्त पीआय सातारकर काय डील करत होते?
वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) निवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलीस ठाण्यात चार दिवसांपासून काय डील करत होते? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच वनराई पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
फॉरेन्सिक लॅबवरही राऊतांचा आक्षेप
रविंद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्त फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे मी ऐकले. पण पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बेवड्या आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! रक्तचाचणी करणाऱ्या या लॅब गृहखात्याच्या अंतर्गत येतात, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला.
निवडणूक अधिकाऱ्यावरही संजय राऊत यांचा आरोप
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करणाऱ्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावरही राऊत यांनी मोठा आरोप केलाय. सूर्यवंशी यांचा वायकर यांना विजयी करण्यामध्ये मोठा हात आहे. Evm मशीन हॅक होऊ शकते असे अब्जाधीश एलॉन मस्क सांगत आहेत.निवडणूक अधिकाऱ्याचा पूर्वेतिहास जाणून घ्यावा. वंदना सूर्यवंशी यांचा मोबाइल सुद्धा जप्त करावा, अशी मागणी राऊत यांनी केली.
हेही वाचा :