नागपूर: राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढण्याची तयारी ओबीसी समाजाकडून (OBC Reservation) करण्यात आल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केले. नागपूरमध्ये  रविवारी ओबीसी संघटनांची विदर्भस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आला. त्यामुळे आता राज्य सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याच्यादृष्टीने कोणती पावले उचलणार, हे पाहावे लागेल. 


नागपूरमधील ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव मंजूर झाला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंचा शासन आदेश GR काढल्यास राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. 


याशिवाय, बैठकीत ओबीसी समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाचे  रक्षण करण्याच्यादृष्टीने या बैठकीत काही ठराव मंजूर झाले. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवार उभे करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. ओबीसी बहुजन पार्टी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल, यावरही एकमत झाले. याशिवाय, राज्य सरकारने अलीकडच्या काळात केलेल्या 57 लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात, अशी ओबीसी समाजाची मागणी असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. 


राज्य सरकारचे शिष्टमंडळ ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार


ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडगोद्री येथे प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रक्तदाब कमी झाल्याने लक्ष्मण हाके यांची प्रकृती काहीशी खालावली आहे.  या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात संदीपान भुमरे, अतुल सावे, भागवत कराड यांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, हे लिहून द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल. 


आणखी वाचा


प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...