पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. अगदी त्याचवेळी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharad Pawar Camp) बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे (Pune) शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. 


यासंदर्भातील अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे. या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड़, जिल्हा अध्यक्ष माज़ी आमदार श्री. जगनाथबाप्पू शेवाळे, माज़ी आमदार कुमारभाऊ गोसावी, अंकुशराव काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.


ठाकरे गटाचाही पुण्यातील सहा जागांवर दावा, मविआ आघाडीत बिघाडीची शक्यता


पुण्यातील विधानसभेच्या सहा जागांवरून महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत. शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटाचाही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा केला आहे. पुण्यातील 8 पैकी सहा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची पवार गट आणि ठाकरे गटाची वरिष्ठांकडे मागणी. 


कोथरूड,पर्वती,वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. तर हडपसर, वडगाव शेरी,शिवाजीनगर, पर्वती,पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला मतदारसंघावर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या जागावाटपावेळी पुण्यातील या मतदारसंघावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप लांबू शकते. 


लोकसभेच्या स्ट्राईक रेटमुळे शरद पवार गट जागा वाढवून मागणार?


लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आहे. या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभानिहाय मतदार संघाची माहिती घेणार. त्यानंतरच्या आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


दरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शेकापसाठी चार जागा मागणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. रायगडमधून ३ आणि सोलापूरमधील १ जागा मागणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.


आणखी वाचा


शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीसाठी चक्रव्यूह रचायला सुरुवात; खडा न खडा माहिती काढा, पदाधिकाऱ्यांना धाडला सांगावा