Sanjay Raut : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ना घर का ना घाट का? अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच कोणत्याही खुर्चीपेक्षा आपला स्वाभीमान महत्वाचा आहे. ही शिकवण आपल्याला बाळासाहेंबानी दिली असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आज जे काही सुरू आहे तो बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लुट, महाराष्ट्राचे अध:पतन आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाचार राज्यकर्ते ज्यात हे लोक सहभागी आहेत. हा जर बाळासाहेबांचा विचार आहे, हे जर त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलाय. एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेनेचे वारस नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचे ठरवले आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा आहे. त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणे. संस्था, मतदारांना विकत घेऊन निवडणूक जिंकणे याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर तुम्ही थुंकण्याचा प्रयत्न करत आहात. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तेच हवे आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच मिळतोय
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शाह यांनी तयार केली. शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते, मात्र लोक शिर्डीलाच जातात. पंढरपूर प्रतिपंढरपूर असते, पण लोक पंढरपूरलाच जातात. या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत. एक मातोश्रीवर आणि दुसरा पंढरपूरला आहे. बाकी अजून कोणी देऊळ बांधले असतील ती तात्पुरती आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे प्रकरण गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाहीत. तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतोय आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय.
शिंदेंनी एक पुस्तक वाचले आहे का?
ठाकरे गटाने आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर लढण्यासाठी मनगटात बळ पाहिजे, अशी टीका केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. त्यांनी कधी एक पुस्तक तरी वाचले आहे का? कधी पेपर तरी वाचतो का माणूस? आम्ही बघून घेऊ आमची मनगटं. तुमच्यावरती मनगट चालवायची वेळ येईल हे लक्षात घ्या. आम्ही तुमच्यासारखी लाचारी पत्करलेली नाही. तुमच्यासारख्या लाचारांनाच असले शब्द सुचू शकतात. महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणे म्हणजे अफजलखानाच्या दरबारात मुजरे करण्यासारखे आहे. ज्यांनी तुम्हाला आज ही पदं दिली आहेत तेच तुमचे पदं काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील, अशा हालचाली दिल्लीत सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा