Sharad Pawar On Uddhav Thackeray: विधानसभेत अनपेक्षितपणे धक्का बसल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा हा गड कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. काल (23 जानेवारी) मुंबईत झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली.
निवडणुका लागल्या नाहीत मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपुर्वी जेव्हा उद्धव ठाकरे माझ्याशी यासंदर्भात सविस्तर बोलले. तेव्हा त्यांची ही विचारसरणी आहे हे कळलं. मात्र त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची टोकाची भूमिका नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी आज (24 जानेवारी) कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
शरद पवार काय म्हणाले? (Sharad Pawar On Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदुत्वाबद्दल सातत्याने यापुर्वीही सांगत आले आहेत. काल दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये दोघांनाही वाटतं की, बाळासाहेबांवर आपला अधिकार आहे. तर लोकांची उपस्थित पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला जास्त लोकांची उपस्थिती होती अशी माझ्याकडे माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या भूमिकेवर देखील शरद पवारांनी भाष्य केलं. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. तेव्हा ते स्वबळाबाबत बोलले होते. पण त्यांची टोकाची भूमिका दिसली नाही. एका राजकीय पक्षाचे ते प्रमुख आहेत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे मेळाव्यात नेमकं काय म्हणाले होते?
काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द बघूया. तुमची तयारी बघूया, ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.