मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam Resignation) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने (Congress) याआधी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर आता निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे. सकाळी 11.30 वाजता ते पुढची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
अमोल कीर्तीकर यांना तिकीट दिल्यामुळे नाराज
संजय निरुपम हे काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते पक्षाचे काम करत होते. या लोकसभा निवडणुकीत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.मात्र ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली. आता या जेगावर अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्यात आले आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते.
6 वर्षांसाठी केले होते निलंबित
मी कोणत्याही परिस्थिती अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत होते. याच कारणामुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या निर्णयानंतर संजय निरुपम यांनीदेखील मोठा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र निरुपम यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले आहे. आज (4 एप्रिल) निरुपम सकाळी 11.30 वाजता त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
संजय निरुपम यांचे खरगेंना खरमरीत पत्र
निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना खरगे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात असलेला मी निर्णय घेत आहे. मी आज माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा. खूप खूप धन्यवाद, असं निरुपम आपल्या पत्रात खरगे यांना उद्देशून म्हणाले आहेत.
कीर्तीकर यांच्याविरोधात प्रचार करणार?
दरम्यान, वेळोवेळी काँग्रेसच्या धोरणांवर बोट ठेवणारे निरुपम आता नेमका काय निर्णय घेणार. ते उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्याविरोधात प्रचार करणार का? त्यांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला काय फटका बसणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा>>