दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जात प्रमाणपत्राविषयी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाल देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणावर वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी चालू होती. मात्र आता ही सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय आज (4 एप्रिल) आपला निर्णय जाहीर करणार आहे. 


सकाळी साडे अकरा वाजता येणार निर्णय


मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. कोर्ट क्रमांक 10 मध्ये हा निर्णय दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीस सकाळी 11.30 वाजता हा निकाल वाचवून दाखवतील. 


राणा आज दाखल करणार उमेदवारी अर्ज


नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. यावेळीदेखील त्यांना महायुतीने तिकीट दिले आहे. त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे तिकीट मिळाल्यानंतर त्या अमरावतीमध्ये जोमात प्रचार करत आहेत. काहीही झालं तरी मीच निवडून येणार, असा दावा त्यांच्याकडून केला जातोय. असे असतानाच सर्वोच्च न्यायालय आज त्यांच्या जात प्रमाणपत्राविषयी निर्णय देणार आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करत दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. 


तिकीट मिळालं पण आज होणार खरा फैसला


नवनीत राणा यांना महायुतीकडून तिकीट मिळालेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्याआधीच सकाळी साडे अकरा वाजता सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल काय ठेवल्यास म्हणजेच राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यास, त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. न्यायालयाने जात प्रमाणपत्रच रद्द केल्यामुळे त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाहीत. तसे झाल्यास राणा यांच्याऐवजी महायुतीकडून दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे आता न्यायालय नेमका निकाल काय देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


नेमकं प्रकरण काय?


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यांना न्यायालयाने दोन लाख रुपयांचा आर्थिक दंडदेखील ठोठावला होता.या निर्णयानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होतं. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनिल भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका 2017 साली दाखल केल्या होत्या. राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे, असा आत्रेप या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला होता.