सांगली:  सांगली लोकसभेमध्ये (Sangli Lok Sabha) काँग्रेसचे (Congress)  बंडखोर विशाल पाटलांना (Vishal Patil) भाजपच्या (BJP)  चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्व पदाचा राजीनामा देत पाठिंबा जाहीर केला आहे.  राजीनामा देत  विशाल पाटलांचा उघड प्रचार सुरू केला आहे. विशाल पाटलांच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याच्या कारणावरून भाजप  कारवाईचा इशारा देण्यात आला होता.


मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतल्याच्या कारणातून  भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे,  निरंजन आवटी,  आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याबरोबर भाजपमधल्या  आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.


भाजप नगरसेवकांमधील नाराजी उघड


त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बद्दल मिरजेतल्या भाजप नगरसेवकांमधील असणारी नाराजी उघडपणे आता समोर आली आहे. या अगोदर देखील भाजपच्या दोन माजी आमदारांनी राजीनामा देत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहेच  अजित घोरपडे आणि विलासराव जगताप या दोन माजी आमदार आणि यापूर्वीच भाजपला रामराम करत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.


प्रचारादरम्यान चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आमनेसामने


सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आज दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये बापट मळाजवळ प्रचारानिमित्त एकाच ठिकाणी आले. या दोघांनीही एकमेकांना मग हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस देखील केली. शहरातल्या बापट मळा या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत असताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची ही भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी हसून एकमेकांची विचारपूस केली. 


सांगली लोकसभेतील राजकीय वातावरण तापले


सांगली लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांना उमेदवारी दिल्यामुळं सांगली काँग्रेसचे नेते नाराज आहे. कारण विशाल पाटील यांना तिकीट मिळावं यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं सांगली लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभेतील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. 


Video : चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आमनेसामने