Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी केली होती. मात्र ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या वाट्याला आली. शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यामुळे जे पी गावित नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी जे पी गावित यांनी दिंडोरीत जाहीर सभा घेत शरद पवारांना (Sharad Pawar) इशारा दिला होता. महाविकास आघाडीने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार, असा इशारा जे पी गावितांनी दिला होता. 


आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकप निवडणूक लढण्यावर ठाम आहे. पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 


दिंडोरीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली 


एकीकडे नाशिकच्या जागेवरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीमध्ये तिढा कायम आहे. तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) माकपच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्यांची गुरुवारी ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दिंडोरीतून माजी आमदार गावित यांना निवडणुकीच्या रिंगण्यात उतरविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. 


जयंत पाटलांकडून मनधरणीचा प्रयत्न


महाविकास आघाडीत पहिल्या दिवसापासून माकपने मित्रपक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, गेल्या आठवड्यात जे पी गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तेथेच महाआघाडीच्या फुटीची पहिली ठिणगी पडली. दिंडोरीत डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट दिंडोरी गाठत गावितांशी चर्चा देखील केली. 


जे पी गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 


त्यावेळी विधानसभेच्या मदतीचा प्रस्ताव पाटील यांनी गावितांसमोर ठेवला. पण, आमचा पक्ष एकदा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेत नाही, असे सांगत गावितांनी पवार गटाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. गावित हे आज माकपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माकपच्या निवडणुकीतील एन्ट्रीमुळे मविआत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. 


दिंडोरीत चौरंगी लढत 


आता दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडी, माकप व वंचित अशी चौरंगी लढत रंगणार आहे. महायुतीतून भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना मैदानात उतरवले आहे. माकपकडून जे पी गावित (J P Gavit) हे उमेदवार असतील तर वंचित बहुजन आघाडीकडून  मालती थविल (Malati Thavil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या चौरंगी लढतीत नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Dindori Loksabha : मी कागदावर चॅलेंज स्वीकारायला तयार! भास्कर भगरेंनी केलेल्या आरोपांवर भारती पवारांचं उत्तर