पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. वाकयुद्धात पटाईत असलेले रोहित पवार हे नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डिवचून जेरीस आणत असतात. आतादेखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांच्या अशाच एका दुखऱ्या नसीला हात घातला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते. पवार घराण्याची नेक्स्ट जनरेशन आणि अजित पवारांचा मुलगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी मावळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे. रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा केली आहे.
माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित दादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करतायेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी भावाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला आहे. या गोष्टीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे रिंगणात उतरले आहेत. मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. यावरुन या मतदारसंघातील त्यांची ताकद लक्षात येऊ शकते. त्यामुळे यंदा संजोग वाघेरे त्यांच्या वर्चस्वाला धक्का देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा